बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई कसोटीत टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. नाणेफेक गमावल्यावर रोहित शर्मानं युवा सलामीवीर यशस्वी जैयस्वालच्या साथीनं टीम इंडियाच्या डावाला सुरुवात केली. अगदी सावध पवित्रा घेत ही जोडी धावफलक हळूहळू पुढे सरकवत होती. भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मासमोर बांगालादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातील खराब कामगिरी सुधारत दमदार खेळी करुन दाखवण्याचे चॅलेंज होते. पण तो यात सपशेल अपयशी ठरला. अवघ्या ६ धावांचे योगदान देत त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला.
बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत रोहितची कामगिरी एकदम ढिसाळ
बांगलादेशच्या ताफ्यातील हसन मेहमूद याने रोहित शर्माला आपल्या जाळ्यात अडकवले. १९ चेंडूचा सामना केल्यानंतर रोहित शर्मा झेल बाद झाला. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. याआधी रोहित शर्मा बांगलादेश विरुद्ध ३ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याच्या खात्यात फक्त ३३ धावा जमा होत्या.
बांगलादेश विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातही फेल ठरला रोहित
चेन्नईच्या मैदानात रोहित शर्मा आधीच्या सामन्यातील सर्व अपयश भरून काढेल अशी अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा तो दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. रोहित शर्मानं २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. चेन्नईच्या मैदानात रोहित शर्मा बांगलादेश विरुद्ध चेन्नईतील मैदानात चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. यावेळीही त्याला लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले आहे.
भारताची खराब सुरुवात, ३४ धावांवर गमावल्या पहिल्या ३ विकेट्स
बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा घेतलेला निर्णय अगदी सार्थ ठरवत भारतीय संघाला सुरुवातीलाच गोत्यात आणले आहे. रोहित शर्माशिवाय शुबमन गिल आणि विराट कोहली हे देखील स्वस्तात तंबूत परतले आहेत. १० षटकांच्या आत भारतीय संघाने अवघ्या ३४ धावांवर ३ विकेट्स गमावल्या आहेत.