भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात साजेशी झाली नाही. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली झटपट माघारी परतले. मात्र, मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. शतकी खेळीनंतर मयांकनं ड्रेसिंगरूममध्ये बसलेल्या कर्णधार विराट कोहलीकडं पाहिले. त्यावेळी त्यानं मयांककडे एक इच्छा व्यक्त केली. त्यावर मयांकनं दिलेलं उत्तर पाहण्यासारखं होतं.
पहिल्या सत्रात बांगलादेशच्या अबू जावेदनं भारताला दोन धक्के दिले. त्यानं पुजाराला झेलबाद करून माघारी पाठवले. अबू जावेदनं कर्णधार कोहलीलाही पायचीत करून तंबूत पाठवले आणि तेही शून्यावर असताना. मागील 11 डावांमध्ये कोहली तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. बांगलादेशविरुद्ध शून्यावर माघारी परतणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी सौरव गांगुली 2004 च्या वन डे सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या रहाणेनं झटपट खेळ केला. मयांकनेही फटकेबाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी रहाणेसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण, सामन्याच्या ब्रेकमध्ये रहाणेनं वैद्यकीय मदत बोलावली. रहाणेनं या सामन्यांतून कसोटी क्रिकेटमधील 4000 धावांचा पल्ला ओलांडला. असा पल्ला पार करणारा तो 16वा भारतीय फलंदाज ठरला.
अजिंक्य माघारी परतल्यानंतर मयांकची फटकेबाजी सुरूच राहिली. मयांकने दीडशतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ यालाही मागे टाकले. 2019मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत स्मिथ आघाडीवर होता. स्मिथनं 4 सामन्यांत 774 धावा केल्या होत्या. मयांकने आज तो विक्रम मोडला. त्याच्या नावावर 8 सामन्यांत 778+ धावा झाल्या आहेत. शतकी खेळीनंतर जेव्हा मयांकनं ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या विराटकडे पाहिले, तेव्हा त्यानं खेळत राहा, 200 धावा कर असा सल्ला दिला.
पाहा व्हिडीओ..