भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात साजेशी झाली नाही. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली झटपट माघारी परतले. मात्र, मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. मयांकनं दुसरे वैयक्तित द्विशतक झळकावले. त्यानं सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला.
पहिल्या सत्रात बांगलादेशच्या अबू जावेदनं भारताला दोन धक्के दिले. त्यानं पुजाराला झेलबाद करून माघारी पाठवले. अबू जावेदनं कर्णधार कोहलीलाही पायचीत करून तंबूत पाठवले आणि तेही शून्यावर असताना. बांगलादेशविरुद्ध शून्यावर माघारी परतणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी सौरव गांगुली 2004 च्या वन डे सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या रहाणेनं झटपट खेळ केला. या सामन्यांतून कसोटी क्रिकेटमधील 4000 धावांचा पल्ला ओलांडला. असा पल्ला पार करणारा तो 16वा भारतीय फलंदाज ठरला.
उपहारानंतर मयांकने आपले शतक पूर्ण केले. त्यानं 197 चेंडूंत 15 चौकार व 1 षटकार खेचून 105 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे तिसरे शतक ठरले. पण, रहाणेला शतकानं हुलकावणी दिली. 172 चेंडूंत 9 चौकारांसह 86 धावा केल्या. रहाणेनं चौथ्या विकेटसाठी मयांकसह 190 धावांची भागीदारी केली. अजिंक्य माघारी परतल्यानंतर मयांकची फटकेबाजी सुरूच राहिली. मयांकनं मेहिदी हसनच्या गोलंदाजीवर षटकार खेचून द्विशतक पूर्ण केले. त्यानं 304 चेडूंत 25 चौकार व 5 षटकार खेचत द्विशतक पूर्ण केले.
मयांकने या खेळीसह सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला. कसोटीत सर्वात जलद दोन द्विशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांत मयांकनं दुसरं स्थान पटकावलं. त्यानं 12 डावांत दोन द्विशतकं झळकावली. ब्रॅडमन यांना 13 डाव खेळावे लागले होते. या विक्रमात भारताचा विनोद कांबळी अव्वल आहे. त्यानं 5 डावांमध्ये दोन द्विशतकं पूर्ण केली होती.
- एकाच वर्षी दोन द्विशतकंवीरेंद्र सेहवागनं 2008 मध्ये अशी कामगिरी केली होती.
- षटकार खेचून द्विशतकरोहित शर्मानं 2019मध्ये रांची येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत षटकार खेचून द्विशतक पूर्ण केले होते. मयांकनं आज तेच केले.