भारत-बांगलादेश यांच्यातील चेन्नई कसोटी सामन्यात अश्विन-जड्डू जोडीचा धमाकेदार शो पाहायला मिळाला. जड्डूच्या मागून आलेल्या अश्विननं तुफान फटकेबाजी करत पहिल्या दिवसाअखेर नाबाद शतक झळकावलं. दुसरीकडे रवींद्र जडेजा शतकाच्या उंबरठ्यावर आहे. या जोड गोळीनं बांगलादेशविरुद्ध विक्रमी भागीदारी करत टीम इंडियाच्या ताफ्यात आनंदी आनंद गडे वातावरण निर्माण केले.
अश्विननं ड्रेसिंग रुममधील सहकारी खेळाडूंसह चाहत्यांना दिल सरप्राइज
पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन याने सुरुवातीच्या पन्नास धावा तर अगदी टी-२० क्रिकेटच्या अंदाजात काढल्या. यावेळी त्याच्या भात्यातून उत्तुंग फटकेबाजीचा नजराणाही पाहायला मिळाला. बांगलादेशचा स्टार ऑल राउंडर शाकीब अल हसन याच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला षटकार इतका अप्रतिम होता की, भारतीय ड्रेसिंग रुममधील खेळाडूंसह स्टेडियमवरील चाहत्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव पाहायला मिळाले.
आक्रमक अंदाजात बॅटिंग करत अश्विननं पाडले प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे खांदे
भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात अल्प धावसंख्येत आटोपणार असे चित्र निर्माण झाले असताना अश्विन जड्डूनं मिळून हे चित्रच पालटलं. अश्विनने फलंदाजीला आल्यावर पहिल्या ७ चेंडूचा सामना करताना तीन खणखणीत चौकार मारून आक्रमक अंदाजातील फलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे खांदे पाडले.
शाकिब अल हसनचं स्लॉग सिक्सरसह केलं स्वागत
शाकीब अल हसन गोलंदाजीला आल्यावर त्याचे स्वागत अश्विनने अप्रतिम स्लॉग स्वीप सिक्सरनं केले. अश्विननं त्याच्या गोलंदाजीवर मारलेला सिक्सर डोळ्याचे पारणे फेडणारा होताच. पण जिथं स्टार फलंदाज फोल ठरले तिथं अश्विनचा हा तोरा बघून अनेकजण आश्चर्यचकितही झाले. त्याने मारलेल्या सिक्सरचा आणि त्यावर चाहत्यांसह ड्रेसिंगरुमधील रिअॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.