Rishab Pant vs Liton Das Viral Video : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना (IND vs BAN 1st Test) चेन्नईच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आघाडीच्या तीन विकेट्स पडल्यावर जवळपास दोन वर्षांनी कसोटीत कमबॅक करणाऱ्या रिषभ पंतनं अगदी तोऱ्यात बॅटिंग केली. सलामीवीर यशस्वी जैस्वालसोबत भारतीय संघाच्या डावाला आकार देण्याच काम त्यानं केलं. पण अर्धशतकी भागीदारीनंतर ही जोडी फुटली. रिषभ पंत ३९ धावांवर बाद झाला.
अन् लिटन दासवर भडकला पंत
या सामन्यात रिषभ पंत आणि बांगलादेशचा विकेट किपर लिटन दास यांच्यात शाब्दिक चकमकीसह एक वादग्रस्त सीन पाहायला मिळाला. रिषभ पंत बांगलादेशी खेळाडूवर चांगलाच भडकल्याचे दिसून आले. दोघांच्यात घडलेली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
भाई मुझे क्यों मार रहे हो, पंतची कमेंट चर्चेत
जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात पंत रागारागाने बांगलादेश विकेट किपरला जाब विचारताना दिसते. "उसको फेंको ना भाई मुझे क्यों मार रहे हो" (चेंडू त्याच्याकडे टाक, मला कुठं मारतोस) ही पंतची कमेंट स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाली आहे. लिटन दास याने चेंडू पकडल्यावर तो यष्टीवर मारण्याऐवजी पंतला लागला असावा. त्यामुळेच पंत रागात त्याला सुनावल्याचे दिसते. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते.
पंतनं यशस्वीसह सावरला डाव
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मासह स्टार किंग कोहली स्वस्तात माघारी फिरले. शुबमन गिलला तरी खातेही उघडता आले नाही. पण संघ अडचणीत असताना युवा सलामीवीर यशस्वी जैयस्वाल यानं एका बाजूनं किल्ला लढवण्याची क्षमता दाखवून दिली. त्याला पंतची उत्तम साथ मिळाली. दोघांनी लंचआधी अर्धशतकी भागीदारीसह संकटात सापडलेल्या टीम इंडियाचा डाव सावरण्याचे काम केले.
संघ अडचणीत असताना उतरला होता मैदानात! फिफ्टी हुकली, पण महत्त्वपूर्ण भागीदारी रचली
पंत मैदानात उतरला त्यावेळी भारतीय संघाने अवघ्या ३४ धावांवर ३ गडी गमावले होते. ज्यात कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्या विकेट्सचा समावेश होता. पंतनं तोऱ्यात फटकेबाजी करत संघाला सावरणारी खेळी केली. तो मोठी खेळी करेल, असे संकेत दिसत असताना पुन्हा एकदा हसन महमूद याने टीम इंडियाला धक्का दिला. पंत ५२ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ३९ धावा करून तंबूत परतला. बाद होण्यापूर्वी त्याने यशस्वी जैस्वालसोबत चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.