India vs Bangladesh, 1st Test बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था अगदी बिकट झाली आहे. रोहित शर्मा स्वस्तात माघारी फिरल्यावर त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला प्रिन्स अर्थात शुबमन गिल याला खातेही उघडता आले नाही. तोही रोहितची विकेट घेणाऱ्या हसन महमूदच्या जाळ्यात फसला. भारतीय संघाच्या धावफलकावर अवघ्या २८ धावा असताना शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला.
प्रिन्स शुबमन गिलच्या पदरी भोपळा!
बांगलादेश विरुद्धच्या सामन्याआधी शुबमन गिल हा देशांतर्गत क्रिकेटमधील दुलिप करंडक स्पर्धेत भारत 'अ' संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. या स्पर्धेतही त्याला लौकिला साजेसा खेळ करताना आला नव्हता. पण तरीही त्याला टीम इंडियात संधी मिळाली. पण या संधीचं सोन करण्यात तो अपयशी ठरला. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात ८ चेंडूचा सामना करून त्याच्या पदरी भोपळा आला.
किंग कोहलीसमोरही हसन महमूदनं फिरवली जादूची कांडी
मोठ्या ब्रेकनंतर कसोटीसाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीसमोरही बांगलादेशच्या युवा जलदगती गोलंदाजाने जादूची कांडी फिरवली. जवळपास ९ महिन्यांच्या अंतरानंतर कमबॅक टेस्ट खेळणाऱ्या विराट कोहलीला अवघ्या ६ धावांवर तंबूत परतावे लागले. विराट कोहली हा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात दिसला नव्हता. बागंलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातून तो दमदार कमबॅक करेल, अशी आशा होती. भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसह पुढच्या चार महिन्यात १० कसोटी सामने खेळणार आहे. विराट कोहलीकडून आगामी सामन्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. पण पहिल्या सोप्या पेपरमध्ये तो फेल झाला आहे.
पाकविरुद्धच्या मालिका विजयानं वाढला आहे बांगलादेशचा आत्मविश्वास
भारत दौऱ्याआधी बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानला त्यांच्या घरात जाऊन पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्यांनी २-० असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. या मालिका विजयानं त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. चेन्नई कसोटी सामन्यात त्यांनी भारतीय आघाडीला सुरुंग लावून त्याची झलकही दाखवली आहे. तो आत्मविश्वास कितपत टिकणार ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: India vs Bangladesh, 1st Test Shubman Gill Dismissed For A Duck Virat Kohli Also Fails Against Hasan Mahmud
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.