भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरला चेन्नईच्या मैदानात रंगणार आहे. एमए चिदम्बरम स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार याची चर्चा मॅचआधी रंगत आहे. बांगलादेश विरुद्धच्या लढतीआधी रोहित शर्मानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लोकेश राहुल प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार ही गोष्ट स्पष्ट केली होती. त्यानंतर आता संघाचा मुख्य कोच गौतम गंभीरनं बाकावर बसवण्यात येणाऱ्या दोघांची नावे सांगितली आहेत.
या दोघांना चेन्नई कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही मिळणार स्थान
चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात विकेट किपर बॅटर ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांना बाकावरच बसावे लागणार आहे. भारतीय संघाने मार्चमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात जुरेल आणि सर्फराज दोघेही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होते. दोघांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून अगदी दमदार पदार्पण केले होते. सर्फराज खान याने ३ कसोटी सामन्यात ३ अर्धशतकाच्या मदतीने २०० धावा केल्या होत्या. दुसरीकडे ध्रुव जुरेल याने ३ सामन्यात एका अर्धशतकासह १९० धावांचे योगदान दिले होते.
पंत आणि केएल राहुलमुळं प्रभावित खेळी करूनही त्यांना बसावं लागणार बाकावर
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून रिषभ पंत आणि लोकेश राहुल ही मंडळी भारतीय संघात कमबॅक करणार आहेत. त्यामुळेच ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांचा प्लेइंग इलेव्हनमधील पत्ता कट झाला आहे. गंभीरनं बागंलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, ''आम्ही कुणाला ड्रॉप करत नाही. पण फक्त ११ खेळाडूच मैदानात उतरु शकतात. जुरेल आणि सर्फराज यासारख्या खेळाडूंना कदाचित वाट पाहावी लागेल."
बुमराहचं कौतुक, संघासोबतच्या बॉन्डिंगवरही बोलला गंभीर
जसप्रीत बुमराह मोठ्या ब्रेकनंतर संघात कमबॅक करत आहे. या स्टार गोलंदाजाबद्दल गंभीर म्हणाला की, "जसप्रीत बुमराह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे. तो ड्रेसिंगरुममध्ये असणं टीमसाठी चांगलेच आहे. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्यात आहे.'' गंभीरच्या कोचिंगच्या नव्या इनिंगमधील हा पहिला कसोटी सामना आहे. या संघातील अनेक खेळाडूंसोबत मी क्रिकेट खेळलो आहे. सर्व वरिष्ठ खेळाडूंशी माझे चांगले संबंध आहेत. हे नातं आणखी पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असेन, असेही गंभीरनं म्हटले आहे.
फिरकीसमोर ढेपाळलेल्या फलंदाजांची पाठराखण
यावेळी गौतम गंभीरला भारतीय संघाच्या फलंदाजीतील उणीवांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत भारतीय फलंदाजांनी फिरकीसमोर नांगी टाकली होती. या प्रश्नावर गंभीरनं फलंदाजांची पाठराखण केली. फिरकी आणि जलदगती दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी भारतीय फलंदाजी भक्कम आहे. वनडे आणि कसोटीत खूप मोठं अंतर आहे. भारतीय संघ एकेकाळी फलंदाजीवर अवलंबून असायचा. पण आता बुमराह, शमी, अश्विन आणि जडेजा यासारख्या गोलंदाजांनी हे चित्रच बदललं आहे, ही गोष्ट सांगत त्याने भारतीय गोलंदाजांवर स्तुती सुमने उधळली आहेत.