इंदूर : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर मयांक अगरवालने द्विशतक झळकावले. त्याचे हे दुसरे द्विशतक ठरले. पण या सामन्यात मयांकला कर्णधार कोहलीने एक इशारा केला होता. याबाबतचा खुलासा मयांकने सामना संपल्यावर केला आहे.
भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयात मयांकच्या द्विशतकाचाही मोलाचा वाटा होता. पण सामना संपल्यावर मयांकने कोहलीबाबतचा एक खुलासा केला आहे.
कोहलीला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. पण दुसरीकडे मयांकने मात्र द्विशतक झळकावले. त्याने २४३ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. जेव्हा मयांकने द्विशतक झळकावले तेव्हा कोहलीने ड्रेसिंग रुममधून त्याला एक इशारा केला होता. या इशाऱ्याचा खुलासा मयांकने आता केला आहे.
मयांकच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभारला. मयांकने द्विशतक झळकावले तेव्हा त्याने आपली बॅट उंचावली. बॅट उचांवत मयांकने ड्रेसिंग रूमकडे पाहिले. त्यावेळी तिथे कोहली होता. मयांकने यावेळी दोन बोटं दाखवत द्विशतक झळकावले, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोहलीने तीन बोटं दाखवली आणि त्रिशतक पूर्ण कर, असा इशारा केल्याचे मयांकने सांगितले.
भारताच्या विजयासह कोहलीचा नवा विक्रमभारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
कोहलीने एक कर्णधार म्हणून आतापर्यंत बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यातील विजयासह कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरूद्दिन यांना पिछाडीवर टाकले आहे.
आतापर्यंत अझरने प्रतिस्पर्ध्यांना आठवेळा डावांनी मात केली होती. त्यानंतर धोनीने नऊवेळा हा पराक्रम केला होता. या सामन्यापूर्वी धोनी आणि कोहली हे समान ९ विजयांवर एकत्र होते. पण या सामन्यात भारताने बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला आणि प्रतिस्पर्ध्यांना सर्वाधिक वेळा एका डावाने पराभूत करण्याची किमया कोहलीने साधली. आतापर्यंत १० वेळा कोहलीने प्रतिस्पर्ध्यांना दहा वेळा एका डावाने मात केली आहे.