भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया कसोटीतील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी सज्ज आहे. पण, बांगलादेश संघानंही कंबर कसली आहे. पहिल्या ट्वेंटी-20 प्रमाणे टीम इंडियाविरुद्ध कसोटीत पहिल्यांदा विजय मिळवण्यासाठी ते उत्सुक आहे. कर्णधार विराट कोहलीच्या पुनरागमनानं टीम इंडियाची फलंदाजांची फळी अधिक मजबूत झाली आहे. पण, रिषभ पंतला संधी देण्यावरून अजूनही मतमतांतर आहे. रिषभ पंतला पाठीवरील अपयशाचं भूत अजूनही उतरवता आलेलं नाही. त्यामुळे या कसोटीत टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन म्हणजेच अंतिम अकरा खेळाडू कसे असतील हे जाणून घेऊया...
सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीनं पहिल्या कसोटीत तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरणार असल्याचे संकेत दिले. तो म्हणाला,''खेळपट्टी पाहता येथे जलदगती गोलंदाज खेळवणे फायद्याचे ठरेल. उमेश यादव, मोहम्मद यांनी सराव सत्रात चांगली गोलंदाजी केली आहे.''
कोहली म्हणाला, ''बुमराह अजूनही पूर्णपणे तंदुरुस्ती नाही. इशांत शर्मानं गेल्या दोन वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये आमच्या यशात त्याचा मोठा वाटा आहे. तो 4-5 विकेट सहज घेतो आणि त्यामुळे अन्य गोलंदाजांची कामगिरीही सुधारते. ''