इंदूर : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
कोहलीने एक कर्णधार म्हणून आतापर्यंत बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यातील विजयासह कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरूद्दिन यांना पिछाडीवर टाकले आहे.
आतापर्यंत अझरने प्रतिस्पर्ध्यांना आठवेळा डावांनी मात केली होती. त्यानंतर धोनीने नऊवेळा हा पराक्रम केला होता. या सामन्यापूर्वी धोनी आणि कोहली हे समान ९ विजयांवर एकत्र होते. पण या सामन्यात भारताने बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला आणि प्रतिस्पर्ध्यांना सर्वाधिक वेळा एका डावाने पराभूत करण्याची किमया कोहलीने साधली. आतापर्यंत १० वेळा कोहलीने प्रतिस्पर्ध्यांना दहा वेळा एका डावाने मात केली आहे.
भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजयभारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी दमदार विजय मिळवला.
भारताने एकूण ३४३ धावांची आघाडी मिळवल्यानंतर बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले. पण दुसऱ्या डावातही बांगलादेशच्या फलंदाजांची पडझड पाहायला मिळाली. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत त्यांची उपहारापर्यंत ४ बाद ६० अशी स्थिती केली होती. त्यामुळे चहापानापर्यंत भारत विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे वाटले होते.
दुसऱ्या सत्रात रहीमने दमदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा सामना केला. रहीमने चहापानापर्यंत सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ५३ धावांची खेळी साकारली होती. रहीमला मेहंदी हसनने नाबाद ३८ धावांची खेळी साकारत चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. भारताकडून सर्वाधिक बळी चार मोहम्मद शमीने पटकावले.