Who is Hasan Mahmud: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात टॉस जिंकून पाहुण्या बांगलादेश संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या ताफ्यातील २४ वर्षीय हसन महमूद याने आपल्या कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवला. त्याने सुरुवातीलाच टीम इंडियाला एका पाठोपाठ एक असे धक्के दिले.
युवा गोलंदाजांसमोर भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज गडबडले
या युवा गोलंदाजासमोर टीम इंडियाचे शेर ढेर झाल्याचा सीन पाहायला मिळाला. त्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिल आणि विराट कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवले. आता या तगड्या आणि स्टार खेळाडूंची विकेट घेतल्यावर त्याची चर्चा तर होणारच. जाणून घेऊयात टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग लावणाऱ्या बांगलादेशच्या युवा गोलंदाजासंदर्भातील खास माहिती
बांगलादेशच्या या गोलंदाजानं टीम इंडियाला दिल्ले धक्क्यावर धक्के
चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात टॉस गमावल्यानंतर भारतीय संघावर पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आली. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मानं भारताच्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पहिल्या ५ षटकानंतर भारतीय सलामी जोडीनं धावफलकावर १४ धावा लावल्या होत्या. सहाव्या षटकात हसन महमूद आला अन् रोहित शर्माच्या ६ (१९) रुपात त्याने टीम इंडियाला पहिला धक्का दिला. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या शुबमन गिलला त्याने खातेही उघडू दिले नाही. त्यानंतर त्याने किंग कोहलीलाही ६(६) स्वस्तात माघारी धाडले. या युवा गोलंदाजामुळे भारतीय संघाची अवस्था ३ बाद ३४ धावा अशी बिकट झाली.
कोण आहे हसन महमूद?
बांगलादेशच्या ताफ्यातील २४ वर्षीय हसन महमूद उजव्या हाताने मध्यम जलगती गोलंदाजी करतो. या गोलंदाजानं २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण सुरुवातीच्या ४ वर्षांच्या काळात तो फक्त व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये संघाचा भाग होता. संघ व्यवस्थापनाला आपल्या गोलंदाजीनं प्रभावित करत त्याने कसोटी संघात स्थान मिळवले. यावर्षीच ३० मार्च, २०२४ रोजी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाकिस्तान विरुद्धच्या ऐतिहासिक विजयातही त्याचा मोलाचा वाटा होता. या दौऱ्यात पहिल्यांदा त्याने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या.