भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यावर अनिश्चिततेचं सावट आहे. पहिला ट्वेंटी-20 सामना दिल्लीच्या प्रदुषणात पार पडला. बांगलादेशनं 7 विकेट्स राखून हा सामना जिंकून इतिहास घडवला. भारताने विजयासाठी ठेवलेले 149 धावांचे लक्ष्य बांगलादेशनं 7 विकेट्स राखून सहज पार केले. मुश्फिकर रहीमच्या नाबाद 60 धावांनी बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत प्रथमच भारतीय संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. दिल्लीतील पराभवानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी राजकोट येथे रवाना झाली आहे. या सामन्यावर महा चक्रीवादळाचे सावट आहे. पण, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
सध्या मध्य पूर्व अरबी समुद्रात महा चक्रीवादळ आले आहे. ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल आणि त्यानंतर पूर्व ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीकडे वळेल. त्यामुळे पुढील 48 तासांत मुंबईत हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 7 नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास दक्षिण गुजरात किनाऱ्यावर पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. गुजरातच्या जमिनीवर पोहोचण्याच्या वेळेस ते चक्रीवादळ किंवा कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. चक्रीवादळ म्हणून जर ही प्रणाली जमिनीवर आली, तर अत्यंत खवळलेला समुद्र आणि मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम अधिकच वाईट असेल, अशी भीती वर्तविण्यात आली आहे.