दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने धावांची बरसात केली. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने दुसऱ्या सामन्यात आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला. दुसऱ्याच सामन्यात त्याने आपलं पहिलं आणि धमाकेदार अर्धशतक झळकावले. त्याच्यासह रिंकू सिंहच्या बॅटमधूनही फटकेबाजी पाहायला मिळाली. परिणामी भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ९ बाद २२१ धावा केल्या. यासह या सामन्यात भारतीय संघाने दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
नितिश रेड्डी अन् रिंकूचा धमाका
नितिश रेड्डी २१७.६५ च्या सरासरीनं ३४ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ खणखणीत चौकारांसह ७ गगनचुंबी षटकारही मारले. दुसऱ्या बाजूला रिंकू सिंहनं २९ चेंडूत ५३ धावांची धमाकेदार इनिंग खेळली. या दोघांशिवाय हार्दिक पांड्याने ३२, अभिषेक शर्मा-रियान पराग यांनी प्रत्येकी १५-१५ धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी १५ षटकार आणि १७ चौकार मारले.
षटकारांची बरसात
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात षटकारांची बरसात करत भारतीय संघाने खास विक्रम आपल्या नावे नोंदवला. बांगलादेश विरुद्ध एका टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावे झाला आहे. याआधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडीजच्या नावे होता. २०१२ मध्ये मीरपूरच्या मैदानात कॅरेबियन संघानं बांगलादेश विरुद्धच्या टी-२० सामन्यात १४ षटकार मारले होते.
बांगलादेश विरुद्ध एका टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे संघ
- १५- भारत, दिल्ली- २०२४
- १४- वेस्टइंडीज, मीरपूर- २०१२
- १३- इंडिया, नॉर्थ साउंड- २०२४
बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संंघाने ९ विकेट्सच्या मोबदल्यात २२१ धावा केल्या. हा देखील एक रेकॉर्डच आहे. बांगलादेश विरुद्ध एखाद्या संघाने टी-२० सामन्यात उभारलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा संघ टॉपला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०१७ मध्ये बांगलादेश विरुद्धच्या टी-२० सामन्यात २२४ धावा केल्या होत्या.
बांगलादेश विरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड सेट करणारे संघ
- २२४/४ साउथ अफ्रीका, पोटचेफस्ट्रूम- २०१७
- २२१/९ भारत, दिल्ली- २०२४
- २१४/६ श्रीलंका, कोलंबो- २०१८
- २०१०/४ श्रीलंका, सिलहट- २०१८