भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20त रोहित शर्मानं तिसऱ्या पंचांना शिव्या घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याच्या या कृत्याची गंभीर दखल घेतली जाऊ शकते आणि त्याच्यावर मोठी कारवाईही केली जाऊ शकते. नेमकं असं काय घडलं?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, बांगलादेशच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून भारताच्या चमून चिंतेचं वातावरण निर्माण केलं. बांगलादेशनं पहिल्या पॉवर प्ले मध्ये एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. सहाव्या षटकात भारताला यश मिळालं होतं, परंतु यष्टिरक्षक रिषभ पंतची एक चूक महागात पडली.
सहाव्या षटकात रोहितनं चेंडू फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती सोपवला. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभनं स्टम्पिंग करताना लिटन दासला माघारी पाठवले. पण, तिसऱ्या पंचांनं रिषभची एक चूक पकडली अन् बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान मिळालं. पंतनं चेंडू स्टम्पच्या पुढे पकडून स्टम्पिंग केली आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नो बॉल देत लिटन दासला नाबाद ठरवलं. त्यानंतर सातव्या षटकात रोहितनं लिटनचाच झेल सोडला. पण, त्यानंतर पंतनेच टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. पंतनं लिटन दासला धावबाद करून माघारी पाठवले. लिटनने 21 चेंडूंत 4 चौकारांसह 29 धावा केल्या. बांगलादेशनं 10 षटकांत 1 बाद 78 धावा केल्या.
मुश्फिकर रहिम ( 4) आणि सौम्या सरकार ( 30) एकाच षटकात बाद झाले. 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंतनं सरकारला यष्टिचीत केले. पण, तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला आणि सुरुवातीला नाबाद असा निर्णय दिला. पण, त्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी निर्णय मागे घेत सरकारला बाद दिले. पंचांच्या या चुकीवर रोहित भडकला आणि शिव्या दिल्या. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला...