India vs Bangladesh: 2nd T20I meet in Rajkot hangs in balance as Cyclone Maha threat looms largeभारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना दिल्लीच्या प्रदुषणात पार पडला. बांगलादेशनं 7 विकेट्स राखून हा सामना जिंकून इतिहास घडवला. भारताने विजयासाठी ठेवलेले 149 धावांचे लक्ष्य बांगलादेशनं 7 विकेट्स राखून सहज पार केले. मुश्फिकर रहीमच्या नाबाद 60 धावांनी बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत प्रथमच भारतीय संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. दिल्लीतील पराभवानंतर टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी राजकोट येथे रवाना झाली आहे. पण, याही सामन्यावर अनिश्चिततेचं सावट आहे.
सध्या मध्य पूर्व अरबी समुद्रात महा चक्रीवादळ आले आहे. येत्या 24 ते 36 तासांत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल आणि त्यानंतर पूर्व ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीकडे वळेल. त्यामुळे पुढील 48 तासांत मुंबईत हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी किंवा 7 नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास दक्षिण गुजरात किना-यावर पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. गुजरातच्या जमिनीवर पोहोचण्याच्या वेळेस ते चक्रीवादळ किंवा कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. चक्रीवादळ म्हणून जर ही प्रणाली जमिनीवर आली, तर अत्यंत खवळलेला समुद्र आणि मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम अधिकच वाईट असेल, अशी भीती वर्तविण्यात आली आहे.
त्यामुळे राजकोट येथे होणारा सामन्याला महा चक्रीवादळाचा धोका असू शकतो आणि अशा परिस्थितीत सामना रद्द करावा लागू शकतो.