भारत विरुद्घ बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे, कारण भारतात प्रथमच डे नाइट ( दिवस रात्र) आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होणार आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी हा वेगळाच अनुभव असणार आहे. हे दोन्ही संघ प्रथमच डे नाइट कसोटी खेळणार आहेत. त्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडू कसून सरावही करत आहेत. पण, या डे नाइट कसोटीपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला स्वप्न पडू लागले आहे. आता काय आहे हे स्वप्न आणि रहाणे सोशल मीडियावर कसा व्यक्त झालाय, ते पाहूया...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यानं या कसोटीसाठी सर्व तयारी केली आहे. टीम इंडिया आणि बांगलादेशच्या खेळाडूंना गुलाबी चेंडूवर खेळण्याचा पुरेसा सराव मिळावा म्हणून संघांसाठी विशेष रात्रीचे सराव शिबीरही भरवण्यात आले आहे. विराट कोहली आणि अन्य खेळाडू या सामन्यासाठी कसून सराव करत आहेत. टीम इंडियानं इंदूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कोलकाता कसोटीमध्ये सर्वांना 'पिंकू-टिंकू' पाहायला मिळणार असल्याचे समजले जात आहे. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर ऐतिहासिक सामन्याची जोरदार तयारी सुरु आहे. मैदानामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी यावेळी पाहायला मिळणार आहेत. या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरण्यात येणार आहे. त्यामुळे मैदानात गुलाबी रंगाचे फुगे लावण्यात येणार आहेत. गांगुली सर्व गोष्टींची जातीने पाहणी करत आहे. गांगुलीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये गांगुलीच्या हातामध्ये कसोटी सामन्याच्या तिकीटाची प्रातिनिधक प्रत आहे. त्याचबरोबर या फोटोमध्ये 'पिंकू-टिंकू'ही दिसत आहेत.
या सामन्यासाठी किती उत्सुक आहोत, या आशयाचा फोटो रहाणेनं मंगळवारी पोस्ट केला. त्यात त्यानं असं म्हटलं की, मला आतापासूनच डे नाइट कसोटी सामन्याची स्वप्न पडू लागली आहेत.
Web Title: India vs Bangladesh, 2nd Test: Already dreaming about the historic pink ball test; Team India vice captain Ajinkya Rahane tweet
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.