India vs Bangladesh, 2nd Test Day 2 Match Delayed Due To Rain : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशीही कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर पावसाची बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंसह चाहत्यांसमोर 'वेट अँण्ड वॉच' परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस थांबला तरी मैदान सुकवण्यासाठी म्हणावी तेवढी उत्तम आणि सुसज्ज व्यवस्था कानपूरच्या ग्रीन पार्कच्या मैदानात नाही. त्यामुळे सामना सुरु होण्यास खूप वेळ लागू शकतो. दुसऱ्या दिवशी किती षटकांचा खेळ होणार ते पाहण्याजोगे असेल?
पावसाची रिमझिम, संपूर्ण मैदानावर पसरण्यात आलंय कव्हर
कानपूरच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला होता. पहिला दिवस दोन्ही संघांसाठी सम-समान राहिला. भारतीय संघाला तीन विकेट्स मिळाल्या. दुसरीकडे बांगलादेशच्या संघाने खेळ थांबला त्यावेळी धावफलकावर १०७ धावा लावल्या होत्या. पहिल्या दिवशीचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेल्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर सुरु करण्यात येणार होता. शनिवारी सकाळी मैदानावरील कव्हर हटवण्यातही आले होते. पण ९ वाजता सामना सुरु होण्याआधी पुन्हा पावसाने आपली बॅटिंग सुरु केली. पाऊस मोठा नसला तरी रिमझिम पावसानं संपूर्ण मैदान कव्हरखाली आहे. हा सीन क्रिकेट लव्हर्सची निराशा करणारा आहे.
उर्वरित ३ दिवसांचा खेळ पूर्ण झाला तरी टीम इंडियासाठी तो वेळ ठरेल पुरेसा
पावसाच्या व्यत्ययानंतर बहुतांश मैदानात तुम्ही फक्त खेळपट्टी कव्हर केल्याचे पाहिले असेल. पण हे कानपूर आहे. ग्रीन पार्कची परिस्थिती थोडी वेगळी आहे. इथं संपूर्ण मैदान कव्हर करावे लागते. त्यामुळे पाऊस थांबल्यावरही ग्राउंड्समनसाठी मैदान खेळण्यायोग्य करण्याची एक मोठी कसोटीच असते. आधी ते यात पास झाल्यावरच मॅच सुरु होण्याचा मार्ग मोकळा होईल. पहिल्या दिवसाच्या तुलनेत वातावरण हळूहळू खेळण्यायोग्य होत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. कारण उर्वरित तीन दिवसांचा खेळ जरी पूर्ण झाला तर तेवढा वेळ टीम इंडियासाठी पुरेसा ठरेल.