भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने बांगलादेशच्या फलंदाजांना हैराण करून सोडले आहे. पहिल्या अर्ध्यातासांत पहिली विकेट गमावल्यानंतर मैदानात उतरलेल्या लिटन दासच्या रुपात मोहम्मद सिराजनं टीम इंडियाला आजच्या दिवसातील दुसरी विकेट मिळवून दिली. या विकेट सह बांगलादेश संघाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. लिटन दास याची विकेट सिराजच्या खात्यात दिसत असली तरी या विकेटमध्ये रोहित शर्मानं लाख मोलाचं योगदान दिलं. बॅटिंगमध्ये बेस्ट टायमिंग दाखवून देणाऱ्या हिटमॅन रोहित शर्मानं हवेत उडी मारून बेस्ट कॅच टिपला.
हवेत उडी मारत कॅप्टन रोहित शर्मानं टिपला अप्रतिम झेल
हिटमॅन रोहित झाला सुपरमॅन
बांगलादेशच्या डावातील ५० व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर लिटन दास याने स्टेप आउट करत मिड ऑफच्या दिशेनं चौकार मारण्याच्या इराद्याने फटका मारला. पण रोहित शर्माच्या कमालीच्या क्षेत्ररक्षणामुळे त्याचा हा प्रयत्न फसला. एवढेच नाही तर त्याला विकेटही गमवावी लागली. जवळपास ७.९ फुट उंचीवर असणारा झेल पकडण्यासाठी भारताच्या हिटमॅननं सुपरमॅनच्या अंदाजात हवेत उडी मारून कमालीच्या टायमिंगसह एका हातात झेल पकडला. बांगलादेशच्या धावफलकावर १४८ धावा असताना संघाने लिटन दासच्या रुपात पाचवी विकेट गमावली.
कसोटी मालिकेत भारतीय संघाची आघाडी
बांगलादेश विरुद्धच्या २ सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानात रंगला होता. हा सामना जिंकतून टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. कानपूर कसोटी सामन्यातही भारतीय संघ सहज बाजी मारेल, असे वाटत होते. या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. पण तीन दिवस पावसानं केलेल्या खेळामुळे त्याचा निर्णय योग्य होता तेच दिसून आले. पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला. ज्यात बांगलादेशच्या संघाने ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही चेंडू फेकला गेला नाही. आता दोन दिवसांत सामना निकाली लावून टीम इंडिया नवा इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल.