भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्यात पावसाच्या खेळानंतर तिसऱ्या दिवशी खेळाडू अगदी वेळेत मैदानात उतरले. फक्त दोन दिवस उरले असताना सामना निकाली लागणे मुश्किल दिसते. पण असंभव वाटणारी गोष्ट संभव करून दाखवण्याच्या इराद्याने भारतीय संघाने अगदी आक्रमक फिल्डिंग सेटअपसह तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली.
टीम इंडियाची जबरदस्त सुरुवात, बुमराहनं मिळवून दिलं पहिल यश
बांगलादेशच्या संघाकडून मोमीनुल हक (Mominul Haque) आणि मुशफिकुर रहिम (Mushfiqur Rahim) ही जोडी ३ बाद १०७ धावसंख्येवरुन खेळ पुढे सरकवण्यासाठी मैदानात आली. दुसऱ्या बाजूला भारताकडून जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप या दोघांनी गोलंदाजीचा मारा सुरु केला. या दोघांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत बांगलादेशच्या जोडीला अडचणीत आले. शेवटी जसप्रीत बुमराहला यशही मिळाले. त्याने पहिल्या अर्ध्यातासाच्या आत टीम इंडियाला यश मिळवून दिले.
परफेक्ट सेटअप करून काढली विकेट
जसप्रीत बुमराहनं डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या मोमीनुल हक आणि उजव्या हाताने खेळणाऱ्या मुशफिकुर रहिमला चांगलेच दमवलं. रहिमला अनेक चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकून बुमराहनं त्याच्या विकेटसाठी सेटअप केला. एक चेंडू आत आणला अन् त्यात बांगलादेशी खेळाडू चांगलाच फसला. चेंडू उसळी घेईल, असे वाटल्यानं त्याने चेंडू सोडला पण तो थेट स्टम्पवर आदळला आणि बुमराहने अप्रतिम चेंडूवर रहिमला तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहनं चौथ्या स्टम्पवर टाकलेला चेंडू स्टम्पवर येऊन आदळेल याची कल्पनाही बॅटरनं केली नव्हती. पण कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं त्याला सरप्राइज देत बोल्ड केलं. रहिमनं ३२ चेंडूचा सामना करून २ चौकाराच्या मदतीने ११ धावा काढल्या. चेन्नईच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यातही बुमराहनं रहिमची विकेट घेतली होती. त्यावेळी बुमराहनं त्याला आउट स्विंग चेंडूवर चकवा दिला होता.
आधी नशिबाची साथ दिली अन् चौकारही, मग बुमराहनं दुसऱ्याच चेंडूवर केलं बोल्ड
बांगलादेशच्या संघाने ३ बाद १०७ धावांवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिले १६ चेंडू निर्धाव गेल्यावर रहिम यानेच पहिली धाव काढली होती. बांगलादेशच्या डावातील ४१ व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर रहिमला नशिबाची साथ मिळाली आणि बॅटची कड घेऊन गेलेल्या चेंडूनं त्याच्या खात्यात४ धावांची भर पडली. पण दुसऱ्याच चेंडूवर अगदी त्याच धाटणीतला चेंडू टाकत बुमराहनं त्याचा खेळ खल्लास केला.