भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशीचा खेळही वेळेत सुरु होऊ शकलेला नाही. पाऊस थांबला असला तरी मैदानातील काही भागात पावसाचे साचलेले पाणी आणि ओलसरपणा या गोष्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यातही उशीर होत आहे. सकाळी १० वाजता पंचांनी मैदानाच निरीक्षण केले. त्यानंतर आता दुपारी १२ वाजता पुन्हा पंच आणि मॅच रेफ्री मैदानाचे निरीक्षण करणार आहेत. त्यानंतरच तिसऱ्या दिवशीचा खेळ होणार की नाही ते स्पष्ट होईल.
खेळपट्टी अन् बॉलिंग मार्क ओके, पण
भारताचा माजी गोलंदाज आणि समालोचकाच्या भूमिकेत दिसणारा आर पी सिंग हा कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर आहे. पहिल्या दोन दिवस छत्री घेऊन फिरणारा आरपी सिंग यावेळी छत्रीशिवाय दिसला. जिओ सिनेमा मॅच पाइंट शोमध्ये त्याने कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानातील परिस्थिती काय त्यासंदर्भात थोडक्यात आढावाही दिला. खेळपट्टी आणि बॉलिंग मार्कवर पावसाचा फारसा परिणाम झालेला नाही. पण सीमारेषेलगतच्या काही भागात अजूनही ओलसरपणा आहे. ग्राउंड्समन अशा ठिकाणी माती टाकून मैदान लवकरात लवकर सुकवण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहेत, असे तो म्हणाला. जोपर्यंत सूर्याची किरण पडत नाहीत तोपर्यंत परिस्थितीत उत्तम होणार नाही, असेही तो म्हणाला. त्यामुळे दुपारनंतरच खेळ होऊ शकतो, असे चित्र दिसत आहे.
पहिल्या दोन दिवसांत काय घडलं?
कानपूरच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला होत्या. यात बांगलादेशच्या संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावा केल्या होत्या. दुसऱ्या पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे संपूर्ण दिवस पाण्यात गेला. ९ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय मैदानात रंगलेल्या कसोटीतील एक अख्खा दिवस वाया गेल्याचे पाहायला मिळाले. आता तिसऱ्या दिवशी वातावरण बदलल्यानंतर ते कितपत कायम राहणार अन् भारतीय संघ मैदानात उतरल्यावर झटपट विकेट्स घेत डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
खेळ सुरु झाल्यावर पहिल्या तासाभरात जलगदती गोलंदाजांचा दिसू शकतो जलवा
दुपारच्या निरीक्षणानंतर भारतीय संघ मैदानात उतरला तर तिसऱ्या दिवशीच्या खेळातील पहिल्या तासाभराच्या खेळात जलदगती गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या प्रमुख गोलंदाजांना पहिल्या दिवशी एकही विकेट मिळाली नव्हती. तिसऱ्या दिवशी ते संघाला दमदार सुरुवात करुन देण्यास प्रयत्नशील असतील. जर तासाभरात जलगती गोलंदांना मदत मिळाली कोणता भारतीय गोलंदाज हवा करणार तेही पाहण्याजोगे असेल. आतापर्यंत आकाश दीप दोन विकेट्स घेऊन आघाडीवर आहे.