कानपूर कसोटी सामन्यात उर्वरित वेळात सामन्याचा निकाल लागणार का? हा एक मोठा प्रश्न आहे. पण तिसऱ्या दिवशी भारतीय संघ ज्या ऊर्जेनं मैदानात उतरलाय ते पाहता टीम इंडिया अगदी सकारात्मक दृष्टिने सामन्याकडे पाहत असल्याचे दिसून येते. तिसऱ्या दिवशी ३ बाद १०७ धावांवरुन खेळ पुढे नेणाऱ्या बांगलादेशला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने ३ धक्के देत बॅकफूटवर ढकलले. यात जसप्रीत बुमराहच्या कमालीच्या इ नस्विंगनंतर रोहित शर्माचा अफलातून कॅच पाहायला मिळाला. त्यात मोहम्मद सिराजनं हम किसी से कम नहीं अंदाजात फिल्डिंगचा सर्वोत्तम नजराणा पेश केला.
सिराजचा अप्रतिम कॅच टीम इंडियाच्या फिल्डिंगचा सर्वोत्तम दर्जा दाखवणारा
आर. अश्विनच्या गोलंदाजीवर शाकिब अल हसनचा एक अप्रतिम कॅच घेत मोहम्मद सिराजनं आपल्यातील फिल्डिंगची दर्जा दाखवून दिला. आर अश्विन याने फ्लाइट चेंडूवर शाकिबला फसवलं. दुसरीकडे कॅचची निर्माण झालेल्या संधीच सिराजनं सोनं केले. कॅच घेताना चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवणं किती महत्त्वाचं असते ते बेसिक सिराजच्या कॅचमधून पाहायला मिळाले. मागच्या बाजूला जात कॅचसाठी त्याने केलेला प्रयत्न सहज सोपा वाटत होता. पण शेवटच्या टप्प्यात चेंडू थोडा मागे राहतोय हे त्याच्या लक्षात आलं. अंदाज चुकला पण चेंडूवरील शेवटपर्यंत नजर ठेवतं त्याने शाकिबचा अगदी करेक्ट कार्यक्रम केला. हा कॅच पकडताना सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला एवढेच नाही तर डाव्या हातात त्याने हा झेल टिपला.
रोहित भारी की सिराज
सिराजनं डाव्या हातात अप्रतिम झेल टिपण्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं कमालीचा झेल घेतला होता. टीम इंडियात सर्वोत्तम कॅच घेणाऱ्या फिल्डरला मेडल देण्याची एक परंपरा पाहायला मिळते. त्यामुळे दोघांच्यात कुणाचा कॅच भारी अशी चर्चा रंगली तर नवल वाटू नये. दोघांनी घेतलेला कॅच अप्रतिम होता यात वाद नाही. पण रोहितनं उजव्या हातात घेतलेल्या सुपर कॅचनंतर सिराजनं डाव्या हातात कॅच घेतला. त्यात तो एक जलदगती गोलंदाज आहे. त्यामुळे काही क्रिकेट प्रेमींनी रोहितपेक्षा सिराजचा कॅच अधिक भारी वाटू शकतो.
शाकिब अल हसनच्या रुपात बांगलादेशला सहावा धक्का
शाकिब अल हसनच्या रुपात बांगलादेशच्या संघाला १७० धावांवर सहावा धक्का बसला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कानपूर कसोटी शाकिबसाठी खास होती. पण तो पहिल्या डावात बॅटिंग वेळी आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. १७ चेंडूचा सामना केल्यावरही त्याला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तो ९ धावांवर तंबूत परतला.