भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटीचा तिसरा दिवसही वाया गेला. पहिल्या दोन दिवसांत पावसाच्या बॅटिंगमुळे व्यत्यय आला ते समजण्यासारखे आहे. पण तिसऱ्या दिवशी पाऊस नसल्यामुळे मोठ्या आशेनं मैदानात आलेल्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. सकाळी १० वाजता पंचांनी मैदानाची पाहणी केल्यावर दुपारी १२ वाजता पुन्हा मैदानाचं निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर तिसऱ्यांदा दुपारी २ वाजता पुन्हा एकदा पंचांनी मैदानावर फेरफटका मारत एकही चेंडू न फेकता दिवस संपल्याचे स्पष्ट केले. मैदान सुकवण्याच्या यंत्रणेअभावी तिसरा दिवस वाया गेला. यावरून आता नेटकरी बीसीसीआयला ट्रोलही करत आहेत.
पाऊस गेला, पण बीसीसीआयचा निर्णय फसला!
आता पाऊस नसताना तिसऱ्या दिवशीचा खेळ का झाला नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडू शकतो. या प्रश्नाच उत्तर शोधायला गेलं तर पाऊस पडल्यावर मैदान पूर्ववत करण्यासाठी जी आवश्य यंत्रणा लागते त्याचा आभाव ग्रीन पार्कच्या मैदानात आहे, ते दिसून येते. कानपूरच्या स्टेडियमवर फारसे सामने होत नाहीत. देशभरातील चाहत्यांना क्रिकेटचा आनंद घेता यावा, याच उद्देशाने बीसीसीआयने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमची निवड केली. पण पण हा निर्णय आता बीसीसीआयच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आवश्यक सुविधा नसताना या मैदानात सामना खेळवण्याची बीसीसीआयची चूक टीम इंडियाला महागातही पडू शकते. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने बांगलादेश विरुद्धचा कसोटी सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आणि एक सोपा पेपर होता. त्यामुळेच या मैदानात सामना घेऊन बीसीसीआयने मोठी चूक केलीये का? असा प्रश्नही आता निर्माण होत आहे.
न्यूझीलंड-अफगाणिस्तानच्या कसोटी सामन्यामुळे BCCI वर ओढावली नामुष्की
ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंग पथिक क्रीडा संकुलातील स्टेडियमवर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना पाऊस आणि स्टेडियममधील अपुऱ्या सुविधा यामुळे चर्चेत आला होता. १३४ वर्षांच्या इतिहासात आठव्यांदा या सामन्यात एकही चेंडू न फेकता सामना रद्द करण्याची वेळ आली होती. मैदानात सुकवण्यासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक पंखे आणि मैदानातील ग्राउंड्समनचा मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी झालेला प्रयत्न चर्चाचा विषय ठरला होता. यात आता कानपूरच्या मैदानातील अपुऱ्या सुविधेची भर पडली आहे. कानपूरच्या मैदानातील प्रकारानंतर तरी बीसीसीआय धडा घेणार का? ते येणारा काळच ठरवेल.
सोशल मीडियावर बीसीसीआयला करण्यात येतय ट्रोल
सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत. द क्रिकेट हॉल एक्स अकाउंटवर दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात इंग्लंडमधील यंत्रणा आणि भारतीय यंत्रणा यांच्यातील फरक दाखवत बीसीसीआयला ट्रोल केल्याचे दिसते. याशिवायही श्रीमंत बीसीसीआय फक्त आयपीएलवर पैसा उधळत आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत.
Web Title: India vs Bangladesh 2nd Test Day 3 Play abandoned due to poor drainage at Green Park stadium in Kanpur BCCI Troll On Social Media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.