कानपूर कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांत आटोपला आहे. रवींद्र जडेजानं खालेद अहमदला कॉट अँण्ड बोल्ड करत बांगलादेशचा खेळ खल्लास केला. दुसऱ्या बाजूला शतकी खेळी करणारा मोमिनुल हक १९४ चेंडू १०७ धावा करून नाबाद राहिला.
फक्त मोमिनुल लढला, बाकी स्वस्तात आटोपले
बांगलादेशच्या संघाकडून मोमिनुल एकटा लढला. त्याच्या शतकी खेळीशिवाय कर्णधार शान्तोनं ३१ धावा केल्या. शादमान इस्लाम (२४) ,मेहंदी मिराजच्या (२०), लिटन दास (१३), मुशिफिकुर रहिम (११) या फलंदाजांनी कसा बसा दुहेरी आकडा गाठला. पण मैदानात तग धरण त्यांना जमलं नाही.
बुमराहनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स, जडेजानं गाठला ३०० विकेट्सचा टप्पा
रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आकाश दीप याने दोन तर अश्विननं एक विकेट घेतली होती. दुसरा आणि तिसरा दिवस पाण्यात गेल्यावर चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि सिराजशिवाय रवींद्र जडेजाची जादू पाहायला मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय सिराज, आकाश दीप आणि अश्विनच्या खात्यात प्रत्येकी २-२ तर विकेट्स जमा झाल्या. रवींद्र जडेजाने एकमेव विकेटसह ३०० विकेट्सचा पल्ला गाठला.
टीम इंडियाला जिंकण्याची संधी
चौथ्या दिवशी अजूनही जवळपास ५० षटकांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे भारतीय संघ वनडे स्टाईल फटकेबाजी करत सामन्यावर मजबूत पकड मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. पहिल्या डावात वनडे स्टाईलमध्ये खेळत दमदार आघाडी घेत कसोटी जिंकण्याची संधी आता टीम इंडियाकडे आहे. टीम इंडियानं याआधीही दोन दिवसांत कसोटी सामना जिंकून दाखवला आहे. त्यानंतर आता कानपूरच्या मैदानात पुन्हा इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल.