भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. पहिल्या दोन दिवशी पावसाची बॅटिंग अन् तिसऱ्या दिवशी मैदानातील पाण्याचा निचरा होण्यासाठी लागलेला वेळ यामुळे बहुतांश वेळ वाया गेला. उर्वरित दोन दिवसांत सामन्याचा निकाल लागणं मुश्किल वाटत असताना टीम इंडिया मात्र अशक्य ते शक्य करण्याच्या इराद्याने मैदानात उतरली. टीम इंडियाच्या या मनसुब्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय संघातील पहिल्या डावात क्रिकेट चाहत्य़ांनी धावांची बरसात झाल्याचा सीन अनुभवला. फास्टर फिफ्टीसह या सामन्यात टीम इंडियाने कसोटीत सर्वात जलद शंभर धावा करण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. एवढेच नाही तर यापुढे जात कसोटीत सर्वात जलद २०० धावांचा टप्पा गाठण्याचा पराक्रमही टीम इंडियाने करून दाखवला आहे.
रोहित शर्मा-यशस्वी जयस्वालची ५५ धावांची भागीदारी
बांगलादेशच्या संघाला अवघ्या २३३ धावांवर आटोपल्यानंतर टीम इंडियाने धमाकेदार अंदाजात आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करताना कसोटीत फास्ट फिफ्टीचा विक्रम टीम इंडियाच्या नावे केला. रोहित शर्मानं ११ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २३ धावा केल्या. तो माघारी फिरल्यावर मैदानात उतरलेल्या शुबमन गिलसोबत यशस्वीनं त्याच तोऱ्यात बॅटिंग केली.
शुबमन गिल-यशस्वी जोडीचाही जलवा
रोहितच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसल्यावर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या जोडीनं अर्धशतकी भागीदारी नोंदवली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्या. यशस्वी जैस्वालनं ५१ चेंडूत १२ चौकर आणि २ षटकाराच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. भारतीय संघाच्या धावफलकावर १२७ धावा असताना यशस्वी बाद झाला. त्याआधी भारतीय संघाने कसोटीत सर्वात जलद शंभरीचा नवा रेकॉर्ड सेट केला होता. भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात १०.१ षटकात शंभरी गाठली होती. दुसऱ्यांदा टीम इंडियाने हा पराक्रम करून दाखवला. कारण याआधीचा रेकॉर्ड हा टीम इंडियाच्या नावेच होता. २०२३ मध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडीज विरुद्ध १२.२ षटकात शंभर धावा केल्या होत्या.
विराट-राहुल जोडी पुढे द्विशतकी विक्रमात घातली भर
आघाडीच्या फलंदाजांनी आपली जबाबदारी चोख बजावल्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुल या जोडीनं ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात सेट झालेला कसोटीतील जलद द्विशतकी रेकॉर्ड मागे टाकला. भारतीय संघाने २४. २ षटकात २०० धावांचा आकडा गाठला होता. याआधी कसोटीत सर्वात जलद २०० धावांचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कांगारुंनी सि़डनीच्या मैदानात २८.१ षटकात २०० धावा केल्या होत्या.