कानपूर कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी बांगलादेश संघाचा पहिला डाव २३३ धावांत आटोपल्यावर भारतीय संघाने आपल्या बॅटिंगमधील तेवर दाखवले. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं टी-२० अंदाजात फटकेबाजी करत धावांची बरसात केली. हा नजारा पहिल्या तीन दिवसांत हिरमोड झालेल्या चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणं फेडणारा असा होता.
रोहित-यशस्वीनं केली चौकार-षटकारांची 'बरसात'
कानपूरच्या ग्रीन पार्कच्या मैदानात यशस्वी जैस्वालनं खणखणीत चौकारासह आपल्या डावाची सुरुवात केली. दुसरीकडे हिटमॅन रोहित शर्मानं बॅक टू बॅक सिक्सर मारत कमी वेळ राहिलेल्या सामन्यात जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरल्याचे संकेत दिले. या जोडीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या ३ षटकांतच धावफलकावर ५० धावा लावल्या. ही कामगिरी टीम इंडियाच्या नावे खास रेकॉर्डची नोंद करणारी होती.
इंग्लंडच्या रेकॉर्डला लागला सुरुंग
कसोटी क्रिकेटमधील जे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत त्यातील ही आतापर्यंतची सर्वात जलद अर्धशतकी भागीदारी ठरते. टीम इंडियाच्या सलामी जोडीनं इंग्लंडचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त करत कसोटी क्रिकेटमधील फास्टर फिफ्टीच्या भागीदारीचा नवा रेकॉर्ड सेट केला. याच वर्षी ट्रेंट ब्रिज कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने वेस्टइंडीज विरुद्ध ४.२ षटकात ५० धावा ठोकल्या होत्या. टीम इंडियाने यापेक्षा एक ओव्हर कमी घेत नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला.
सर्वाधिक वेळा जलद फिफ्टी करणाऱ्या संघांच्या यादीत इंग्लंडचा बोलबाला
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० धावा करणाऱ्या संघांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही इंग्लंड संघाचाच नंबर लागतो. १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने ४.३ षटकात ५० धावा केल्या होत्या. या यादीत चौथ्या क्रमांकावरही पुन्हा इंग्लंडच्याचे नाव येते. २००२ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडच्या संघाने ५ षटकात ५० धावा ठोकल्या होत्या.
रोहित-यशस्वीनं रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप
कानपूर कसोटी सामन्यात कमी दिवसांत सामना जिंकण्याचे चॅलेंज घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने ३ षटकात एकही विकेट न गमावता ५१ धावा करत हा रेकॉर्ड सेट केला. यात यशस्वी जैस्वालन १३ चेंडूत ३० धावा तर रोहित शर्मानं ६ चेंडूत केलेल्या १९ धावांचा समावेश होता. हा रेकॉर्ड सेट झाल्यावर रोहित शर्मा माघारी फिरला. पहिल्या विकेटसाठी त्याने यशस्वी जयस्वालच्या साथीनं २३ चेंडूत ५५ धावांची भागीदारी रचली.