India vs Bangladesh, 2nd Test Day 4 Stumps : कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात रंगलेल्या भारत बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जो सामना अनिर्णित राहिल, असे वाटत होते त्या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहचल्याचे दिसते. चौथ्या दिवसाच्या खेळात बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांत आटोपला. त्यानंतर बॅटिंगला येऊन टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूनं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत बांगलादेशला बॅकफूटवर ढकलले.
अल्प आघाडीसह टीम इंडियानं पहिला डाव केला घोषित, बांगलादेशची दुसऱ्या डावात खराब सुरुवात
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं ९ बाद २८५ धावांवर टीम इंडियाचा पहिला डाव घोषित केला. अवघ्या ५२ धावांच्या अल्प आघाडीसह गोलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने चौथ्या दिवसाअखेर पाहुण्या संघाला २ धक्के देत सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. झाकिर हसन १० (१५) आणि हसन महमूद ४ (९) यांच्या रुपात बांगलादेशच्या संघाने पहिल्या दोन विकेट्स गमावल्या. या दोन्ही विकेट्स अश्विनने घेतल्या. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी बांगलादेशच्या संघाने २ बाद २६ धावा केल्या होत्या. सलामीवर शादमान इस्लाम ७ (४०) आणि पहिल्या डावातील शतकवीर मोमिनुल हक (Mominul Haque) ०(२) ही जोडी मैदानात खेळत होती. बांगलादेशचा संघ अजूनही २६ धावांनी पिछाडीवर असून पाचव्या दिवशी मैदानात तग धरण्याची मोठी कसोटी त्यांच्यासमोर असेल. अल्प आघाडी मिळाल्यावर डाव घोषित करून रोहितनं चौथ्या दिवसाअखेर पाहुण्या संघाला पुन्हा बॅटिंगला यायला भाग पाडला. त्यात त्यांनी दोन विकेट्सही गमावल्या. रोहितचा गेम प्लान एकदम मास्टर स्ट्रोक ठरला आहे.
टीम इंडिया जिंकण्याच्या मूडमध्ये; बांगलादेशसमोर दिवस काढण्याचे चॅलेंज
कानपूरच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात फक्त ३५ षटकांचा खेळ झाला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरा आणि तिसरा दिवस वाया गेल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिल, असे चित्र निर्माण झाले होते. पण चौथ्या दिवशी भारतीय संघाने बॅटिंगला उतरत कमालीच्या फटकेबाजीसह कानपूर कसोटीत एक वेगळा ट्विस्ट आणला आहे. आधीच मालिका गमावलेल्या बांगलादेश संघासमोर अखेरचा दिवस अधिक काळ मैदानात तग धरण्याचे चॅलेंज असेल. अखेरच्या दिवशी अश्विन आणि जड्डूसमोर तग धरणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच टीम इंडियाला या सामन्यात जिंकण्याची संधी आहे.