कानपूर कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी बांगलादेशच्या संघानं २ बाद २६ धावांवरून आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पहिल्या अर्ध्या तासांत आर. अश्विन याने टीम इंडियाला आणखी एक यश मिळवून दिले. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या मोमिनुल हक(Mominul Haque) याला त्याने तंबूचा रस्ता दाखवला.
स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला अन् लेग स्लीपमध्ये KL राहुलनं कॅच टिपला
मोमिनल हक हा कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशकडून सर्वाधिक १३ शतके झळकावणारा फलंदाज आहे. पहिल्या डावातील नाबाद शतकी खेळीमुळे मोठ्या आत्मविश्वासानं तो मैदानात उतरला होता. त्याच्याकडून संघालाही मोठ्या अपेक्षा होत्या. पण आपल्या भात्यातील ताकद असलेला स्वीप शॉट खेळतानाच तो अश्विनच्या जाळ्यात अडकला. अश्विनच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् लोकेश राहुलनं कोणतीही चूक न करता लेग स्लीपमध्ये त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्याच्या रुपात बांगलादेशच्या संघाने दुसऱ्या डावात ३६ धावांवर तिसरी विकेट गमावली. दुसऱ्या डावात पहिल्या तीन विकेट्स या अश्विननंच पटकावल्या आहेत.
पहिल्या डावात नाबाद शतक, पण दुसऱ्या डावात नाही चालली ती जादू, कारण
मोमिनुल हक याने पहिल्या डावात १९४ चेंडूत १७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०७ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याची ही खेळी स्वीप शॉटनंच बहरली होती. पहिल्या डावात त्याच्या विरुद्ध फिल्डिंग सेट करताना जी चूक झाली ती टीम इंडियाने दुसऱ्या डावात भरून काढली. त्याच्यासाठी लेग स्लीपला फिल्डिंग लावून जाळं विणलं गेलं. अन् अश्विनच्या गोलंदाजीवर तो फसला.
टीम इंडियाचा जिंकण्याचा अप्रोच
कानपूर कसोटी सामन्यातील पहिल्या तीन दिवसांत फक्त ३५ षटकांचा खेळ झाला होता. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांत सामन्याचा निकाल लागणं मुश्किल वाटतं होते. पण टीम इंडियाने बांगलादेशच्या संघाला २३३ धावांत आटोपल्यानंतर पहिल्या डावातील बॅटिंग वेळी धमाका केला. अनेक विश्व विक्रम प्रस्थापित करत टीम इंडियाने मॅच जिंकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत दिले. टीम इंडियाने आपला पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला होता. बांगलादेशसमोर अखेरच्या दिवशी भारतीय संघाची ५२ धावांची आघाडी मागे टाकून मैदानात तग धरण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे टीम इंडिया लवकरात लवकर उर्वरित विकेट घेत अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे.