India vs Bangladesh 2nd Test, India Create History With Victory Against Bangladesh : भारतीय संघाने कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे अडीच दिवसाहून अधिक दिवसांचा खेळ पाण्यात गेल्यावर या सामन्याचा निकाल लागेल, याची शक्यता अगदी धूसर झाली होती. पण रोहित अँण्ड कंपनीनं धमक असेल तर अशक्य ते शक्य करून दाखवता येते, हे दाखवून देत कानपूर कसोटी जिंकली आहे. कानपूर कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय संघासमोर फक्त ९५ धावांचे आव्हान होते. ते टीम इंडियाने अगदी सहज पार करत मालिका २-० अशी खिशात घातली. टीम इंडियाने चौथ्या दिवशी पहिल्या डावात स्ट्राइक रेटनं धावा काढण्याचा जो डाव खेळला तो मॅचमधील टर्निंग पाइंट ठरला. घरच्या मैदानावर भारतीय संघाने सलग १८ वी कसोटी मालिका जिंकली आहे.
यशस्वीची फिफ्टी; विराटही नाबाद
बांगलादेशच्या संघाने ठेवलेल्या अल्पधावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल जोडीनं भारताच्या डावाला सुरुवात केली. भारताच्या धावफलकावर फक्त १८ धावा लागल्या असताना मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्याने एका चौकारासह ७ चेंडूत ८ धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या शुबमन गिलही फार काळ टिकला नाही. मेहदी हसन मिराझ याने त्याला ६ धावांवर चालते केले. दुसऱ्या बाजूला युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने आपल्या कामगिरीतील सातत्य राखत अर्धशतकाला गवसणी घातली. सलग दुसऱ्या डावात त्याच्या भात्यातून अर्धशतक आले. भारतीय संघाला विजयासाठी फक्त ३ धावांची गरज असताना मोठा फटका मारून मॅच संपवण्याच्या नादात तो बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंतनं खणखणीत चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या बाजूला विराट कोहली ३७ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला.
कानपूर कसोटीत पावसाची बॅटिंग अन्...
कानपूर कसोटीत पहिल्या दिवसांपासून पावसाचा खेळ पाहायला मिळाला. रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून या सामन्यात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला. पहिल्या दिवसाअखेर बांगलादेशच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. एवढेच नाहीतर त्यानंतर दुसरा आणि तिसऱ्या दिवशी खेळच होऊ शकला नाही. दोन दिवस वाया गेल्यामुळे सामना अनिर्णित राहिल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण चौथ्या दिवशी खेळात नवा ट्विस्ट आला.
चौथ्या दिवशी सामन्यात आली रंगत, टीम इंडियाने अशी दिली सामन्याला कलाटणी
चौथ्या दिवशी भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांत आटोपला. टीम इंडियाने पहिल्या डावात अगदी स्फोटक अंदाजात बॅटिंग करत हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले. सर्वच फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत पहिल्या डावात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले. पहिल्या डावात ५२ धावांची अल्प आघाडी घेतल्यावर भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मानं ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित करत बांगलादेशच्या संघाला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दोन विकेट्स घेत हा प्लान वर्क होणार याचे संकेतही दिले.
पाचव्या दिवशी लंचआधीच बांगलादेशचा खेळ खल्लास
पाचव्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने पहिल्या अर्ध्यातासातच बांगलादेशच्या संघाला तिसरा झटका दिला. पण ड्रिक्स ब्रेकपर्यंत भारतीय संघाच्या खात्यात फक्त एक विकेट्स जमा झाली होती. पुन्हा सामना फसतोय का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण ड्रिंक्स ब्रेकनंतर चेंडू जडेजाच्या हाती आला अन् गेममध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण झाले. उरली सुरली कसर बुमराहनं पूर्ण केली आणि बांगालादेशचा दुसरा डाव अवघ्या १४६ धावांत आटोपला. भारतीय संघाला ९५ धावांचे टार्गेट मिळाले होते.