कानपूर कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय संघ बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत विजय सुनिश्चित करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. आर. अश्विन याच्यानंतर रोहितनं चेंडू जडेजाच्या हाती सोपवला. या लेफ्ट आर्म स्पिनरनं कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत बांगलादेशच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. जड्डूनं बांगलादेशचा कर्णधार शान्तोसह शाकिब अन् लिटन दासला तंबूत धाडत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग आणखी सोपा केला आहे.
आधी अश्विननं केली पहिल्या डावातील 'शतकवीरा'ची शिकर, मग पिक्चरमध्ये आला जड्डू
पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर आर. अश्विन याने पहिल्या अर्ध्या तासांच्या आत पहिल्या डावातील शतकवीर मोमिनुल हक (Mominul Haque) याचा खेळ खल्लास केला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि आकाश दीप पिक्चरमध्ये आले. जड्डूनं बांगालेदशच्या कर्णधार शान्तोला तंबूचा रस्ता दाखवत टीम इंडियाला चौथे यश मिळवून दिले. बांगलादेशच्या कर्णधारानं ३७ चेंडूत १९ धावांची खेळी केली.
आकाश दीपनं विक्रमी फिफ्टी झळकवाणाऱ्या शादमानचा खेळ केला खल्लास
पहिल्या डावात मोमिनुल हक हा बांगलादेशचा संकटमोचक बनला होता. दुसऱ्या डावात सलामीवीर शादमान इस्लाम (Shadman Islam) ती भूमिका बजावताना दिसला. अर्धशतकी खेळीसह त्याने खास रेकॉर्डही आपल्या नावे केला. भारतीय मैदानात अर्धशतकी खेळी करणारा तो बांगलादेशचा पहिला सलामीवीर ठरला. याआधी सोमय्या सरकार याने २०१७ मध्ये हैदराबाद कसोटीत ४२ धावांची खेळी केली होती. यापुढे जात शादमान इस्लाम याने ऐतिहासिक फिफ्टी झळकावली. पण आकाश दीपनं त्याचा काटा काढला. बांगलादेशच्या धावफलकावर ९३ धावा असताना शादमान तंबूत परतला.
टीम इंडिया विजयाच्या अगदी जवळ
बांगलादेशचा कॅप्टन शान्तोला बाद करून थांबतोय तो जड्डू कसला. रवींद्र जडेजाने आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवून देताना लिटन दास आणि शाकिब अल हसन यांनाही तंबूत धाडले. परिणामी बांगलादेशच्या संघाने ९४ धावांवर सातवी विकेटही गमावली. जड्डूनं घेतलेल्या या विकेट्समुळे टीम इंडिया विजयाच्या अगदी जवळ पोहचली आहे.