India vs Bangladesh, 2nd Test, Day 1 has been called off : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस हा खेळाडूंपेक्षा पावसानेच गाजवला. कानपूरच्या ग्रीन पार्कच्या मैदानात सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सामना सुरु होणं अपेक्षित होते. पण सामन्याआधी झालेल्या पावसामुळे मैदानात ओलावा असल्यामुळे शुक्रवारी जवळपास तासभर उशीराने सामना सुरु झाला. त्यानंतरही दिवसभराचा खेळ काही पूर्ण होऊ शकला नाही. ढगाळ वातावरण , अंधूक प्रकाश अन् मग सुरु झालेला पाऊस खेळ वेळेआधीच थांबवण्यात आला.
३ गड्यांच्या मोबदल्यात बांगलादेश संघानं पूर्ण केलं 'शतक'
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाला झटपट बाद करण्याचा त्याचा डाव होता. पण खेळ थांबला त्यावेळी बांगलादेशच्या संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात पहिल्या डावातील ३५ षटकांच्या खेळात धावफलकावर १०२ धावा लावल्या होत्या. मोमीनुल हक ८१ चेंडूत ४० धावांवर नाबाद होता. दुसऱ्या बाजूला मुशफिकुर रहिम १३ चेंडूत ६ धावांवर खेळत होता.
आकाश दीपसह अश्विनला मिळालं यश, बुमराह-सिराजची पाटी कोरीच
भारताकडून आकाश दीपनं दोन विकेट्स घेतल्या. त्याने सलामीवीर झाकिर हसन ०(२४) आणि शादमान इस्लाम २४(३६) यांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय आर. अश्विन याने बांगलादेशचा कर्णधार शान्तो याची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. बांगलादेशच्या कर्णधाराने ५७ चेंडूत ३१ धावा केल्या. या दोघांशिवाय जसप्रीत बुमराहन आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे ९ आणि ७ षटके गोलंदाजी केली. पण त्यांना काही विकेट्सच खाते उघडता आले नाही.
दोन्ही संघापेक्षा पाऊसच पडला भारी!
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील ३५ षटकांच्या खेळात दोन्ही संघांनी बरोबरीनं कामगिरी केली. भारतीय संघाच्या खात्यात आणखी दोन विकेट्स असत्या तर पहिला दिवसाच्या खेळात भारतीय संघ आघाडीवर राहिला असता. पण तीन विकेट गमावून शतकी धावसंख्या करत बांगलादेशच्या संघाने टीम इंडियाच्या बरोबरीनं खेळ केला. पहिल्या दिवसातील अधिक खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दोन्ही संघांशिवाय पावसानेच दिवस गाजवला, असे म्हणता येईल.