भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. २७ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या या कसोटी लढतीवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. एका बाजूला सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. दुसरीकडे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्शभूमीवर पाहुण्यासंघाच्या विरोधात संतप्त लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून दोन्ही संघांतील खेळाडूंभोवती मजबूत सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, अखिल भारतीय हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांविरोधात स्टेडियमसमोर रस्ता अडवून 'हवन' आयोजित केल्याच्या आरोपाखाली सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आले. बांगलादेशातील हिंदूंवरील 'अत्याचार' विरोधात हे आंदोलन करण्यात आले, होते. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त हरीश चंदर यांनी दिली आहे.
कानपूरमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंची भव्य स्वागत
कानपूरच्या मैदानात रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघातील खेळाडू मंगळवारी याठिकाणी दाखल झाले आहेत. खेळाडू ग्रीन पार्क स्टेडियमपासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. पंच तारांकित हॉटेलमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात आले.
खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त
पीटीआयच्या वृत्तानुसार, अप्पर पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) हरीश चंदर म्हणाले आहेत की, भारत आणि बांगलादेश दोन्ही संघांना कडकोट सुरक्षा व्यवस्थेत विमानतळापासून हॉटेलपर्यंत आणण्यात आले. बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही संघ ग्रीन पार्क स्टेडियमवर सराव सत्रात भाग घेणार आहेत.
पंचतारांकित हॉटेल अन् स्टेडियमला छावणीचे स्वरुप
दोन्ही संघातील खेळाडू ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे त्याठिकाणी आणि त्याच्या आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघातील खेळाडू आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जवळपास २ हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ग्रीन पार्क स्टेडियममध्येही अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सामन्याच्या दिवशी स्टेडियममध्ये आणि स्टेडियम परिसरात जवळपास १ हजार पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही सुरक्षा व्यवस्थेच्या रडारवर आहेत.
Web Title: india-vs-bangladesh 2nd Test In kanpur players security hindu mahasabha issued threats ahead of the second Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.