नवी दिल्ली : सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतली आहे. आज दुसऱ्या सामन्यातील दुसरा दिवस पार पडला. भारतीय संघाने आपल्या डावाची सुरूवात निराशाजनक केली. आघाडीचे 4 फलंदाज स्वस्तात परतले होते. मात्र रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर या जोडीने अर्धशतकी खेळी करून डाव सावरला. मात्र या दोघांनाही आपले शतक पूर्ण करता आले नाही. पंत (93) तर अय्यर (87) धावांवर बाद झाला. यजमान बांगलादेशच्या संघाकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 4 बळी पटकावले.
भारतीय संघाने आपल्या डावात सर्वबाद 314 धावा केल्या. पंत आणि अय्यरला वगळता कोणत्याच भारतीय फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यांनी 4-4 बळी पटकावले. तर तस्कीन अहमद आणि मेहदी हसन यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. भारताकडून कर्णधार लोकेश राहुल (10), शुबमन गिल (20), चेतेश्वर पुजारा (24) आणि विराट कोहली (24) धावांवर तंबूत परतले. मात्र रिषभ पंतने अर्धशतकी खेळी करून डाव सावरला. दुसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशचा संघ 6 षटकांत एकही गडी न गमावता 7 धावांवर खेळत आहे.
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जबरदस्त कामगिरी केली. मोमिनूल हक वगळल्यास बांगलादेशच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टीकता आले नाही. 5 बाद 213 वरून बांगलादेशचा संपूर्ण संघ 227 धावांवर तंबूत परतला. आर अश्विन व उमेश यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या आणि भारताला कमबॅक करून दिले.
भारताची शानदार गोलंदाजी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा बहुतेक चाहते थक्क झाले. टीम इंडियाने मागील सामन्यातील हिरो कुलदीप यादवला वगळले आणि त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) संधी दिली. जयदेव पूर्ण 12 वर्षे, 2 दिवसांनंतर टीम इंडियाच्या टेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला. जयदेवने 16 डिसेंबर 2010 रोजी कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर तो आज मैदानावर उतरला. जयदेवने दुसरी कसोटी खेळण्यापूर्वी 118 कसोटी सामन्यांना त्याला मुकावे लागले. दुसरी कसोटी खेळण्यासाठी कोणत्याही भारतीयाची ही सर्वात मोठी प्रतीक्षा आहे. लाला अमरनाथ यांच्या दोन कसोटी सामन्यांमधील अंतर हे 12 वर्ष व 129 दिवसाचे होते. बांगलादेशचा संपूर्ण संघ 227 धावांवर माघारी परतला. उमेशने 25 धावांत 4 आणि अश्विनने 71 धावांत 4 बळी घेतले, तर उनाडकटने 2 बळी घेतले.
दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दुसऱ्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ - शाकिब अल हसन (कर्णधार) नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"