India vs Bangladesh, 2nd Test, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवसही पावसानं खराब केला. एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आला. २०१५ नंतर पहिल्यांदाच कसोटी सामन्यातील पूर्ण दिवस एकही चेंडू न टाकता वाया गेल्याचे पाहायला मिळाले. कानपूरच्या ग्रीन पार्कवर रंगलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला होता.
९ वर्षांपूर्वी पाहायला मिळाला होता संपूर्ण दिवस वाया गेल्याचा सीन
जवळपास नऊ वर्षांनी भारतीय मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात संपूर्ण दिवस एकही चेंडू न टाकता खेळ थांबल्याचा सीन पाहायला मिळाला. याआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना बंगळुरुच्या मैदानात संपूर्ण दिवस वाया गेल्याचे पाहायला मिळाले होते. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दुसऱ्या आणि पाचव्या दिवसाचा खेळच होऊ शकला नव्हता. भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका त्यावेळी भारतीय संघाने २-० अशी जिंकली होती. पण बंगळुरुच्या मैदानातील तो सामना मात्र अनिर्णित राहिला होता. त्यामुळेच याआधी बंगळुरुच्या मैदानात जे घडलं ते कानपूरच्या ग्रीन पार्कवर घडल तर ते टीम इंडियासाठीच तोट्याचं ठरेल.
भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे हा सामना, कारण..
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने बांगलादेश संघापेक्षा भारतीय संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आता उर्वरित ३ दिवसांत वातावरण बदलणार का? सामना झाला तर तो निकाली लागणार का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. कानपूरमधील पावसाचा खेळ असाच सुरु राहिला तर WTC पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघाला त्याचा तोटाही सहन करावा लागेल. पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल हा साडे तीन दिवसांतच लागला होता. त्यामुळे जर उर्वरित तीन दिवसांचा खेळ नियोजित वेळेनुसार झाला तर भारतीय संघ उरलेल्या दिवसांतही कानपूरचं मैदान गाजवू शकतो.
पहिल्या दिवसांत काय घडलं?
पहिल्या दिवशी नाणेफेकीलाच उशीर झाला. रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. अंधूक प्रकाश आणि पाऊस यामुळे खेळ थांबला त्यावेळी ३५ षटकांच्या खेळात बांगलादेशच्या संघाने ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. बांगलादेशचा सलामीवीर झाकिर हसन याला २४ चेंडूचा सामना करूनही खाते उघडता आले नाही. शादमान इस्लाम ३६ चेंडूत २४ धावा करून तंबूत परतला. या दोन्ही विकेट्स आकाश दीपच्या खात्यात जमा झाल्या. २ बाद २९ धावा अशी अवस्था असताना बांगलादेशचा कर्णधार शान्तो आणि मोमीनुल हक या दोघांनी अर्धशतकी भागीदारीसह संघाचा डाव सावरला. पहिल्या दिवशी लंचनंतरच्या खेळात अश्विननं बांगलादेशचा कर्णधार शान्तोला ३१ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. मोमीनुल हक ४० तर मुशफिकर रहिम ६ धावांवर नाबाद खेळत होते.