Ravichandran Ashwin Broke Anil Kumble Record : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या आर. अश्विन याने दुसऱ्या सामन्यात आणखी एका खास विक्रमाला गवसणी घातली. सेट झालेली जोडी फोडण्यात माहीर असलेल्या अश्विननं बांगलादेश संघाचा कर्णधार शान्तोला आउट करत एक मोठा डाव साधला. त्याने 'जम्बो' अर्थात भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याचा विक्रम मोडीत काढला.
अश्विननं मोडला कुंबळेचा विक्रम
कानपूरच्या ग्रीन पार्क येथील मैदानात रंगलेल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे बहुतांश खेळ पाण्यात गेला. पण जेवढा वेळ मिळाला तेवढ्यात अश्विननं विक्रमी संधी साधली. उपहारानंतर अश्विननं बांगलादेशी कर्णधार शान्तोच्या रुपात भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले. या सामन्यात त्याची ही पहिली विकेट ठरली. यासह अश्विननं दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा मोठा विक्रम मोडीत काढला. तो आशियातील मैदानातील कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी आशियाई मैदानात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा अनिल कुंबळेच्या नावे होता. या दिग्गजाने आशियाई मैदानात खेळताना ४१९ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या खात्यात आता ४२० विकेट्स जमा आहेत.
आशियाई किंग मुथय्या मुरलीधरनन पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे अश्विन
आशियातील मैदानात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन याच्या नावे आहे. या दिग्गजाच्या खात्यात ६१२ विकेट्स जमा आहेत. त्यापाठोपाठ आता या यादीत अश्विनचा नंबर लागतो. अनिल कुंबळे ४१९ विकेटसह तिसऱ्या तर श्रीलंकेचा रंगना हेराथ ३५४ विकेट्स सह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. टॉप ५ मध्ये हरभजन सिंगचाही समावेश होता. त्याच्या खात्यात आशियातील मैदानात ३०० विकेट्सची नोंद आहे.
चेन्नई कसोटीत अष्टपैलू कामगिरी
अश्विन आण्णानं घरच्या मैदानातील चेन्नई कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना शतकी खेळी केली होती. चेन्नई कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याच्या खात्यात एकही विकेट दिसली नाही. पण दुसऱ्या डावात त्याने ६ विकेट्स घेत पहिला सामन्यात अष्टपैलू कामगिरीसह हवा केली. आता कानपूर कसोटीतही त्याला अनेक विक्रम खुणावत आहेत.