Akash Deep Convinced Rohit Sharma To Go For A Review : बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आकाश दीप याने रोहित शर्माचा निर्णय सार्थ ठरवणारी गोलंदाजी केली. त्याने पाहुण्या संघातील दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. सलामीवीर झाकिर हसन याला यशस्वी जैस्वालकरीव झेलबाद केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या आकाश दीपनं शादमान इस्लाम याला पायचित केले. भारतीय संघाला मिळालेल्या दुसऱ्या विकेट वेळी पंच राजी नव्हते. आकाश दीपनं जोरदार अपील केल्यावरही पंचांनी नकारात्मक इशारा करत फलंदाज नाबाद आहे, असा निर्णय दिला होता. पण शेवटी त्यांना आपला हा निर्णय बदलावा लागला.
यशस्वी रिव्ह्यूनंतर रोहित-विराटची रिअॅक्शन चर्चेत
मैदानातील पंचांच्या या निर्णयाला आकाश दीपनं चॅलेंज केले. यावेळी कॅप्टन रोहित शर्मालाही DRS साठी राजी करण्याचे आव्हान या गोलंदाजासमोर होते. तो मोठ्या आत्मविश्वानं आपल्या कॅप्टनला DRS घेण्यासाठी मनवताना दिसला. रोहितनंही त्याच्यावर विश्वास दाखवत रिव्ह्यू घेतला. जो अगदी यशस्वी ठरला. त्यानंतर खेळाडूंचा जल्लोष पाहायला मिळाला. त्यात कॅप्टन रोहित शर्मासह विराट कोहली यांची रिअॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे.
आकाश दीपनं बांगलादेश २६ धावांवर पहिला धक्का दिला. झाकिर हसन याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर शादमान इस्लामच्या रुपात टीम इंडियासह आकाश दीपच्या खात्यात दुसरी विकेट जमा झाली. त्याने संघाच्या धावसंख्येत २४ धावांची भर घातली. आकाश दीपच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशच्या संघानं २९ धावांत आपल्या पहिल्या दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर मोमीनुल आणि शान्तो या जोडीनं संघाचा डाव सावरला आहे. उपहारापर्यंत या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करत संघाच्या धावफलकावर २ बाद ७२ धावा लावल्या होत्या.
सिराज, बुमराहच्या गोलंदाजीवरही रिव्ह्यू, पण
आकाश दीपची मर्जी राखणाऱ्या कॅप्टन रोहित शर्मानं या सामन्यात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवरही रिव्ह्यू घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यात सिराजच्या गोलंदाजीवर घेतलेला रिव्ह्यू अपयशी ठरला. तर बुमराहच्या गोलंदाजीवरील रिव्ह्यू अंपाय कॉलमुळे जाता जाता वाचला.