हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने नवा रेकॉर्ड सेट केला. तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माच्या रुपात पहिली विकेट अगदी स्वस्तात गमावली. पण त्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार शो दाखवत धावांची लयलुट केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांची बरसात करत एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे.
संजू सॅमसन-सूर्यकुमार यादवची तुफान फटकेबाजी
बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पहिली विकेट गमावल्यानंतर संजू सॅमसन आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी फटकेबाजीत हायगय केली नाही. परिणामी भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. या जोडीनं पहिल्या ६ षटकात म्हणजे अवघ्या ३६ चेंडूत धावफलकावर ८२ धावा लावल्या.
याआधीचा रेकॉर्ड केला उत्तम
याआधी भारतीय संघाने २०२१ मध्ये दुबईच्या मैदानात स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये ८२ धावा ठोकल्या होत्या. पण यावेळी टीम इंडियाने २ विकेट्स गमावल्या होत्या. हा रेकॉर्ड सर्वोत्तम करत भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध एक विकेट्सच्या मोबदल्यात ८२ धावा कुटल्या.
भारतीय संघाचा टी-२० क्रिकेटमधील पॉवर प्लेमधील रेकॉर्ड
- १ बाद ८२ धावा विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
- २ बाद ८२ विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, २०२१
- २ बाद ७८ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहन्सबर्ग, २०१८
- १ बाद ७७ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिरुनंतपुरम, २०२३
- १ बाद ७७ धावा विरुद्ध श्रीलंका, २००९