Join us  

पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री

२२ वर्षीय गोलंदाजाला मालिकेतील सर्वच्या सर्व सामन्यात संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोनंही करून दाखवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 12:33 AM

Open in App

भारतीय संघाच्या ताफ्यातील युवा जलदगती गोलंदाज मयंक यादवनं (Mayank Yadav) बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत खास छाप सोडली. पदार्पणाच्या सामन्यात निर्धाव षटकासह सुरुवात करत पुढच्या षटकात विकेटच खात उघडणाऱ्या २२ वर्षीय गोलंदाजाला मालिकेतील सर्वच्या सर्व सामन्यात संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोनंही करून दाखवलं. दुसऱ्या सामन्यातही त्याच्या खात्यात एक विकेट जमा झाल्याचे पाहायला मिळाले होते.

अन् मयंक यादवनं यावेळी पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर घेतली विकेट

 तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवनं त्याला पहिल्याच षटकात गोलंदाजीला आणलं. या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेत त्याने कर्णधारानं दाखवेला भरवसा सार्थ करून दाखवला. एवढेच नाही  तर पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट घेत त्याने खास क्लबमध्ये एन्ट्रीही मारली. 

आखूड टप्प्याच्या चेंडूवर चकवा  

हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ६ बाद २९७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाची सुरुवातच खराब झाली. मयंक यादवनं परवेझ हुसेनला आखूड टप्प्याचा चेंडू टाकून आपल्या जाळ्यात अडकवले. युवा गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्यात तो चुकला अन् स्लिपमध्ये रियान परागनं त्याचा सोपा झेल टिपला. 

पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर टीम इंडियाला यश मिळवून देणारे गोलंदाज

या विकेटसह मयंक यादवची खास क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला. याआधी हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार या तिघांनी असा पराक्रम करून दाखवला होता.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेश