Sanju Samson becomes second-fastest Indian to score hundred in T20Is: बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत सूर्या अन् गौतीनं ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत संजू सॅमसन याने मिळालेल्या बढतीचा पुरेपुर फायदा उठवला. बांगलादेश विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या संजू सॅमसन याने तिसऱ्या सामन्यात डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी केली. भारताच्या डावातील १३ व्या षटकातील मेहदी हसनच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारून त्याने आपल्या टी२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यासाठी त्याने फक्त ४० चेंडू खेळले.
फास्टर सेंच्युरी करणाऱ्या भारतीय बॅटरच्या यादीत दुसरा नंबर
टी-२० क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकवताना संजू सॅमसन याने खास रेकॉर्डही सेट केला आहे. भारताकडून सर्वात जलद शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी २०१७ मध्ये रोहित शर्मानं ३५ चेंडूत शतक साजरे केले होते. त्याच्यापाठोपाठ आता संजू सॅमसनचा नंबर लागतो. संजू सॅमसन याने बांगलादेश विरुद्ध ४७ चेंडूत १११ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ११ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. यात एका ओव्हरमध्ये त्याने ५ गगनचुंबी षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.