भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी सुरुवातीला खेळपट्टीवर जम बसवला त्यानंतर तुफान फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह संघाला 5 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. या सामन्यात 19 धावा करणाऱ्या शिखर धवननं विक्रमाला गवसणी घातली. त्यानं महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्य पंक्तित स्थान पटकावलं. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या विरोधात गेला.
बांगलादेशनं प्रथम गोलंदाजी स्वीकारताना भारताच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट माघारी पाठवले. शफीउल इस्लामनं डावाच्या दुसऱ्याच षटकात रोहित शर्माचा त्रिफळा उडवला. रोहितनं 6 चेंडूंत 2 धावा केल्या. त्यानंतर इस्लामनं सहाव्या षटकात शिखर धवनलाही ( 19) माघारी पाठवले. त्याच षटकात श्रेयस अय्यर माघारी परतला असता, परंतु बांगलादेशच्या खेळाडूनं त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर लोकेश राहुलसोबत अय्यरनं संघाचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. 10 षटकांत भारतानं 2 बाद 71 धावा केल्या.
राहुल व अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. राहुलनं 33 चेंडूंत ( 7 चौकार) आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण, दोन चेंडूंतच तो माघारी परतला. राहुलनं 52 धावा केल्या आणि त्याच्या बाद होण्यानं अय्यरसोबतची 59 धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर अय्यरनं तुफान फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केलं. त्याचं हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 तील पहिलेच अर्धशतक ठरलं. रिषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. त्याला 9 चेंडूंत केवळ 6 धावा करता आल्या. अय्यरचा झंझावात 17व्या षटकात संपुष्टात आला. त्यानं 33 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून 62 धावा केल्या.
संघात संधी मिळालेल्या मनीष पांडेनं अखेरच्या षटकांत जोरदार खेळ केला. इस्लामनं 4 षटकांत 1 निर्धाव टाकताना 32 धावांत 2 विकेट्स घेतल्या. सौम्या सरकारनं 4 षटकांत 29 धावांत 2 फलंदाज माघारी पाठवले. पण, इस्लामनं दोन सोपे झेल सोडले. धवननं 19 धावा करून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1500 धावांचा पल्ला पार केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त 1500 धावा करणारा धवन पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा ( 2539), विराट कोहली ( 2450), महेंद्रसिंग धोनी ( 1617) आणि सुरेश रैना ( 1605) यांनी ही कामगिरी केली आहे.