मीरपूर : आजपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीवर सर्वांच्या नजरा असतील. कारण, सर्वच अनुभवी खेळाडूंसोबत भारतीय संघ या मालिकेत मैदानावर उतरणार असल्याने बांगलादेशवर वर्चस्व गाजवण्याची त्यांच्याकडून अपेक्षा असेल. तसेच सलामीच्या जागेसाठी शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यापैकी कोणाला खेळवायचे, याची डोकेदुखी मात्र कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला सोडवावी लागेल.
जवळपास एका वर्षानंतर भारतात एकदिवसीय विश्वचषक पार पडणार आहे. त्यासाठी या मालिकेपासूनच तयारी सुरू करण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. गेल्या काही वर्षांपासून आयसीसीच्या स्पर्धांसाठी योग्य संघनिवड करण्यात भारतीय संघ कमी पडलेला बघायला मिळाला. अनेकदा गुणवान खेळाडूंचे अनेक पर्याय उपलब्ध असणे ही चांगली गोष्ट समजली जाते. मात्र, भारतासाठी ही परिस्थिती संघनिवडीदरम्यान गोंधळ निर्माण करते आहे. त्यामुळे या मालिकेपासून भारतीय संघव्यवस्थापनाला त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलावी लागतील.
काही वर्षांआधी रोहित शर्मा आणि शिखर धवन ही भारताची प्रमुख सलामीची जोडी होती. मात्र, धवनच्या खेळात सातत्याचा अभाव असल्याने लोकेश राहुल आणि शुभमन गिल यांसारखे दुसरे पर्याय कालांतराने उभे राहिले. परिणामी शिखर संघातून आत-बाहेर होत राहिला. या मालिकेत पुन्हा शिखरकडे जायचे की लोकेश राहुलचा पर्याय निवडावा, याचा संघ व्यवस्थापन विचार करते आहे. दुसरीकडे लोकेश राहुलही टी-२० विश्वचषकात सपशेल अपयशी ठरला होता. पण, क्रिकेटचा प्रकार बदलल्याने तो अधिक वेळ घेऊन फलंदाजी करू शकतो.
शमीच्या अनुपस्थितीत उमरान मलिककडे चांगली संधी आहे. बांगलादेशच्या खेळपट्ट्यांवर त्याचा वेग प्रभावी ठरू शकेल. दीपक चाहर, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांच्यावरही नजर असेल. दुसरीकडे, नवनियुक्त कर्णधार लिट्टन दासच्या नेतृत्वाखाली बांगलादेशचा भारताविरुद्ध मैदानात उतरेल. अनुभवी शाकिब अल हसन भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. तसेच घरच्या मैदानावर बांगलादेशचा संघ भारतासमोर कडवे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.