भारत विरुद्ध बांगलादेश ही मालिका खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेट इतिहासात नोंदवली जाणारी ठरली आहे. भारत दौऱ्यावर येणारा बांगलादेशचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतात प्रथम डे नाईट ( दिवस रात्र) कसोटी सामना खेळवला जाणार आहे आणि तोही ऐतिहासिक इडन गार्डनवर. टीम इंडियासाठी डे नाईट कसोटीचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली सज्ज आहे. या कसोटीसाठी दोन्ही संघांना नीट सराव मिळावा आणि सामना सुरळीत व्हावा यासाठी गांगुलीनं मागवलेल्या चेंडूंचा आकडा पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
इडन गार्डनवर 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या कसोटीसाठी बीसीसीआयनं तब्बत 72 गुलाबी चेंडू मागवले आहेत. SG गुलाबी चेंडूसाठी गांगुली आग्रही आहे आणि बीसीसीआयनंही त्याच चेंडूची मागणी केली आहे. या चेंडूची डे नाईट कसोटीच्या स्पर्धात्मक सामन्यांत अजून चाचपणी झालेली नाही. दुलीप करंडक स्पर्धा कुकाबुरा गुलाबी चेंडूनं खेळवण्यात आली आहे. ''बीसीसीआयनं सहा डझन गुलाबी चेंडूची मागणी केली आहे आणि पुढील आठवड्यात आम्ही ते चेंडू त्यांना देऊ. दक्षिण आफ्रिका मालिकेत आम्ही SG गुलाबी चेंडूमध्ये केलेले सकारात्मक बदल सर्वांना पाहिले,''असे SG गुलाबी चेंडूचे मार्केटिंग व्यवस्थापक पारस आनंद यांनी दिली.
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत.
14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता