चेन्नई कसोटी सामन्यात भारतीय संघाने चौथ्या दिवशीच पाहण्यांना गुडघे टेकायला भाग पाडले. पाकिस्तानमधील ऐतिहासिक विजयामुळे बांगलादेश संघ अगदी गुरमी दाखवत भारत दौऱ्यावर आला. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शान्तो याने भारतीय संघालाही दोन्ही कसोटी सामन्यात पराभूत करण्याचे मनसुबे व्यक्त केले होते. पण भारतीय संघानं त्यांना जागा दाखवली.
चौथ्या दिवशीच पाहुण्यांचा खेळ खल्लास!
चेन्नईच्या मैदानात पाहुण्या संघावर चौथ्या दिवशीच तब्बल २८० धावांनी पराभूत होण्याची वेळ आली. पहिला सामना संपला असला तरी या सामन्या दरम्यान घडलेले किस्से काही संपताना दिसत नाहीत. आता रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
रोहितचा व्हिडिओ चर्चेत
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा मैदानातील रणनितीशिवाय मजेशीर अंदाजानेही अनेकदा लक्षवेधून घेतो. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याचा हा अंदाज वेळो वेळी पाहायला मिळाला. यात एका खास व्हिडिओची भर पडली आहे. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात क्षेत्ररक्षणा वेळी रोहित शर्मा स्टंपवरील बेल्सची आदला बदली करताना पाहायला मिळते.
कॅप्टनचा मजेशीर अंदाज; फुकला जादुई मंत्र!
रोहित शर्माचा हा व्हिडिओ चर्चेत येण्यामागचं कारण तो फक्त बेल्सची आदला बदली करून शांत बसला नाही. ही कृती केल्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी आपल्या जागी पोहचला. तिथून त्याने 'छू-मंतर' या तोऱ्यात मंत्र फुकल्याचा इशाराही केला. त्याचा हा अतरंगी अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. "आबरा का डाबरा, गिली-गिली छू.." असं म्हणत भारतीय कर्णधाराने सामना सुरु असताना प्रतिस्पर्धी बांगालदेश संघावर जादूचा मंत्र फुकला अन् बांगलादेशचे शेर ढेर झाले, या आशयाच्या कमेंट्स व्हायरल व्हिडिओवर उमटल्याचे दिसते.
रोहित शर्माचा फ्लॉप शो
रोहित शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात रोहित शर्मा स्वस्तात आटोपला. त्याला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. याआधीही बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. आतापर्यंत बांगलादेश विरुद्धच्या ४ कसोटी सामन्यात रोहितच्या नावे ४४ धावंची नोंद आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात धमाकेदार कामगिरीसह ही आकडेवारी सुधारण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरेल.