भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील डे नाइट कसोटीचा दुसरा दिवस गाजवला तो विराट कोहलीनं. टीम इंडियाच कर्णधार कोहलीनं शतकी खेळी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 27वे शतकं ठरलं. त्याला अजिंक्य रहाणेनं अर्धशतकी खेळी करताना चांगली साथ दिली. पण, कोहली माघारी परतल्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना गुंडाळलं. भारतानं डाव घोषित करून पहिल्या डावात 241 धावांची आघाडी घेतली आहे. पण, बांगलादेशला दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या दिवसअखेर ते 89 धावांनी पिछाडीवर आहेत.
भारताच्या सलामीवीरांना अपयश आलं. मयांक अग्रवाल ( 14) आणि रोहित शर्मा ( 21) छोटेखानी खेळी केली. पण, पुजारा व विराटनं संघाचा डाव सावरला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना भारताला आघाडी मिळवून दिली. पुजाराला इबादत होसैननं माघारी पाठवलं. अजिंक्य रहाणेनं 69 चेंडूंत 7 चौकार मारताना 51 धावा केल्या. त्यानंतर विराटनं शतक पूर्ण केलं. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारतानं दोनशे धावांची आघाडी घेतली. कोहलीनं 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. ही खेळी डे नाइट कसोटीतील सर्वोत्तम खेळी ठरली.
विराटनं दिवस रात्र कसोटीत शतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचं हे 41वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटनं 188 डावांत 41 शतकं झळकावली, तर पाँटिंगला हा पल्ला गाठण्यासाठी 376 डाव खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 368 डावांत 33 शतकांसह तिसऱ्या स्थानी आहे. कोहली माघारी परतल्यानंतर भारताचे तळाचे फलंदाज झटपट माघारी परतले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. भारताचे 5 फलंदाज 58 धावांत माघारी परतले. भारतानं 9 बाद 347 धावांवर डाव घोषित केला.
बांगलादेशला दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करता आली नाही. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात शदमान इस्लामला ( 0) पायचीत केले. त्यानंतर इशांतनं बांगलादेशला आणखी दोन धक्के दिले. इम्रुल कायस ( 5) आणि कर्णधार मोमिनूल हक ( 0) यांनाही तंबूत पाठवले. उमेश यादवनं बांगलादेशला चौथा धक्का देताना मोहम्मद मिथूनला (6) बाद केले. बांगलादेशची अवस्था 4 बाद 13 अशी दयनीय झाली होती, परंतु त्यानंतर मुश्फीकर रहीम व महमुदुल्लाहनं डाव सावरला. पण, महमुदुल्लाहला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रहीम आणि मेहीदी हसन मिराझ या जोडीनंही अर्धशतकी भागीदारी केली. इशांत शर्मानं मेहीदीला माघारी पाठवून बांगलादेशला पाचवा धक्का दिला. त्यानंतर बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांनी निराश केलं. बांगलादेशनं दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 152 धावा केल्या आहेत. ते अजूनही 89 धावांनी पिछाडीवर आहे.