भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अजून मजबूत केली आहे. भारताच्या खात्यात 360 गुण जमा झाले आहेत. या सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या इशांत शर्माला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं. पण, या सामन्यात असा एक प्रसंग घडला की ज्यामुळे नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत.
या सामन्याचे समालोचन करणाऱ्या हर्षा भोगलेचा माजी कसोटीपटू आणि आता समालोचक असलेला संजय मांजरेकर यानं On Air अपमान केला. त्यानंतर मांजरेकरला रोषाचा सामना करावा लागला. सामन्यादरम्यान मांजरेकर आणि हर्षा भोगले यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले. गुलाबी चेंडूवरील कसोटीचे योग्य परिक्षण व्हायला हवं, असे हर्षा म्हणाला आणि त्यासाठी खेळाडूंना विचारायला हवं, असा सल्ला दिला. त्यावर मांजरेकरनं त्वरित उत्तर दिले. तो म्हणाला, हे हर्षा तुला विचारायला हवं, आम्हाला नाही. आमच्याकडे क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे.''