भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अजून मजबूत केली आहे. या सामन्यात कर्णधार कोहलीनं शतकी खेळी केली. डे नाइट कसोटीत शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनं दिलेल्या सल्ल्यामुळे हे शतक साकारता आलं, असा खुलासा विराटनं केला.
कर्णधार म्हणून विराट कोहलीचं हे 41वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटचा हा झंझावात 136 धावांवर थांबवण्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना यश आलं. कोहलीनं 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. ही खेळी डे नाइट कसोटीतील सर्वोत्तम खेळी ठरली. डे नाइट कसोटीत शतक झळकावणारा तो पाचवा कर्णधार ठरला. दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस ( 2016), ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( 2016), इंग्लंडचा जो रूट ( 2017) आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन ( 2018) यांनी शतक झळकावले आहेत.
सामना झाल्यानंतर विराटनं या शतकामागचं गुपित उलगडले. तो म्हणाला,''डे नाइट कसोटीतील दुपारचे सत्र खेळण्यास खुप सोपे होते. पहिल्या दिवशी मी संध्याकाळच्या सत्रानंतर सचिन ( तेंडुलकर) पाजीशी बोललो आणि त्वेह त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला. गुलाबी चेंडूवर खेळताना तू दुसरे सत्र हे सकाळच्या सत्राप्रमाणे समज, जेव्हा थोडासा काळोख असतो आणि चेंडू स्वींग होतो. त्यामुळे साधारण कसोटीच्या पहिल्या सत्रात फलंदाजी करणे अवघड असते. त्यामुळे दुसरे सत्र हे साधारण कसोटीच्या सकाळच्या सत्राप्रमाणे आणि अखेरचे सत्र हे संध्याकाळच्या सत्राप्रमाणे असेल, असे सचिननं सांगितले.''