भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून भारतीय संघाने याही मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. भारतीय संघ मायदेशात आतापर्यंत सलग 12 कसोटी मालिका जिंकले आहेत. या शिवाय विराटनं ऑस्ट्रेलियाचे दिग्गज अॅलन बॉर्डर यांचा विक्रम मोडला आणि सर्वाधिक यशस्वी कर्णधारांमध्ये अव्वल पाच मध्ये स्थान पटकावलं.
बांगलादेशच्या पहिल्या डावातील 106 धावांच्या भारतानं पहिला डाव 9 बाद 347 धावांवर डाव घोषित केला. बांगलादेशला दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशची अवस्था 4 बाद 13 अशी दयनीय झाली होती. मुश्फीकर रहीम व महमुदुल्लाहनं डाव सावरला. पण, महमुदुल्लाहला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रहीम आणि मेहीदी हसन मिराझ या जोडीनंही अर्धशतकी भागीदारी केली.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात बांगलादेशला धक्का दिला. उमेश यादवनं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं तिसऱ्या दिवसाची दुसरी विकेट घेताना बांगलादेशच्या मुश्फिकर रहीमला तंबूत पाठवले. रहीम एका बाजूनं नांगर रोवून बांगलादेशसाठी खिंड लढवत होता. रहीम 96 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीनं 74 धावा करून माघारी परतला. भारतानं बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला. उमेश यादवनं 5,तर इशांत शर्मानं चार विकेट्स घेतल्या. भारतीय संघानं घरच्या मैदानावर सलग 12 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांमध्ये विराटनं पाचवं स्थान पटकावलं आहे. त्यानं अॅलन बॉर्डर यांचा 32 विजयांचा विक्रम मोडला. विराटच्या नावावर कर्णधार म्हणून 33 विजय आहेत. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ ( 53), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग ( 48), स्टीव्ह वॉ ( 41) आणि वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड ( 36) आघाडीवर आहेत.
डावाच्या फरकानं कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांमध्ये विराटनं क्लाईव्ह लॉईड, स्टीफन फ्लेमिंग आणि अँण्ड्य्रू स्ट्रॉस यांच्या 11 विजयांच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमातही स्मिथ 22 विजयासह आघाडीवर आहे. त्यानंर स्टीव्ह वॉ ( 14) आणि पीटर मे ( 12) यांचा क्रमांक येतो.
Web Title: India vs Bangladesh Day Night Test Match: India skipper Virat Kohli is now among the top five captains with the most number of Test wins
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.