भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर डावानं विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघानं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून भारतीय संघाने याही मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. भारतानं बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवताना आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली. मुश्फिकर रहिमनं एकट्यानं खिंड लढवताना बांगलादेशचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला. उमेश यादवनं 5,तर इशांत शर्मानं चार विकेट्स घेतल्या.
बांगलादेशच्या पहिल्या डावातील 106 धावांच्या उत्तरात भारताच्या सलामीवीरांना अपयश आलं. मयांक अग्रवाल ( 14) आणि रोहित शर्मा ( 21) छोटेखानी खेळी केली. पण, चेतेश्वर पुजारा व विराट कोहलीनं संघाचा डाव सावरला. पुजाराला ( 55 धावा) इबादत होसैननं माघारी पाठवलं. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं 69 चेंडूंत 7 चौकार मारताना 51 धावा केल्या. कोहलीनं 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. कोहली माघारी परतल्यानंतर भारताचे तळाचे फलंदाज झटपट माघारी परतले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. भारताचे 5 फलंदाज 58 धावांत माघारी परतले. भारतानं 9 बाद 347 धावांवर डाव घोषित केला.
बांगलादेशला दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करता आली नाही. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात शदमान इस्लामला ( 0) पायचीत केले. त्यानंतर इशांतनं बांगलादेशला आणखी दोन धक्के दिले. इम्रुल कायस ( 5) आणि कर्णधार मोमिनूल हक ( 0) यांनाही तंबूत पाठवले. उमेश यादवनं बांगलादेशला चौथा धक्का देताना मोहम्मद मिथूनला (6) बाद केले. बांगलादेशची अवस्था 4 बाद 13 अशी दयनीय झाली होती, परंतु त्यानंतर मुश्फीकर रहीम व महमुदुल्लाहनं डाव सावरला. पण, महमुदुल्लाहला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रहीम आणि मेहीदी हसन मिराझ या जोडीनंही अर्धशतकी भागीदारी केली. इशांत शर्मानं मेहीदीला माघारी पाठवून बांगलादेशला पाचवा धक्का दिला. त्यानंतर बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांनी निराश केलं. बांगलादेशनं दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 152 धावा केल्या.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात बांगलादेशला धक्का दिला. उमेश यादवनं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं तिसऱ्या दिवसाची दुसरी विकेट घेताना बांगलादेशच्या मुश्फिकर रहीमला तंबूत पाठवले. रहीम एका बाजूनं नांगर रोवून बांगलादेशसाठी खिंड लढवत होता. रहीम 96 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीनं 74 धावा करून माघारी परतला. भारतानं बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला.