भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर डावानं विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघानं इतिहास घडवला. बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून भारतीय संघाने याही मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या विजयासह टीम इंडियानं कोणत्याही संघाला न जमलेली कामगिरी करून स्वतःला लै भारी ठरवलं. या कामगिरीसह विराट कोहलीनं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. शिवाय एकाही भारतीय कर्णधाराला आतापर्यंत न जमलेली कामगिरी करून दाखवली.
मुश्फीकर रहीम व महमुदुल्लाहनं डाव सावरला. पण, महमुदुल्लाहला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रहीम आणि मेहीदी हसन मिराझ या जोडीनंही अर्धशतकी भागीदारी केली. इशांत शर्मानं मेहीदीला माघारी पाठवून बांगलादेशला पाचवा धक्का दिला. त्यानंतर बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांनी निराश केलं. बांगलादेशनं दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 152 धावा केल्या.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात बांगलादेशला धक्का दिला. उमेश यादवनं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं तिसऱ्या दिवसाची दुसरी विकेट घेताना बांगलादेशच्या मुश्फिकर रहीमला तंबूत पाठवले. रहीम एका बाजूनं नांगर रोवून बांगलादेशसाठी खिंड लढवत होता. रहीम 96 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीनं 74 धावा करून माघारी परतला. भारतानं बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला. उमेश यादवनं 5,तर इशांत शर्मानं चार विकेट्स घेतल्या. भारतीय संघाचा हा सलग सातवा कसोटी विजय ठरला आणि कर्णधार विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं हा ऐतिहासिक पल्ला गाठला. सलग सात कसोटी सामने जिंकणारा कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.