भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या इशांत शर्माला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं. पुरस्कार वितरण सोहळ्यात कर्णधार कोहलीनं भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचे कौतुक केले. या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पुरस्कार आपल्याला मिळेल, असे विराटला वाटले होते. पण, तसे घडले नाही आणि त्यानंतर त्यानं मोठा खुलासा केला.
बांगलादेशच्या पहिल्या डावाच्या 106 धावांच्या उत्तरात भारतानं 9 बाद 347 धावा केल्या. विराट कोहलीनं गुलाबी कसोटीत शतक झळकावण्याच्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संपूर्ण संघ 195 धावांत तंबूत पाठवून भारतानं मालिका 2-0 अशी खिशात घातली. या सामन्या भारताच्या जलदगती गोलंदाजांनी 19 विकेट्स घेतल्या. घरच्या मैदानावर एका कसोटीत जलदगती गोलंदाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या विजयासह भारतीय संघानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 360 गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली.