भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. कोहलीनं 161 चेंडूंत 102 धावा करताना दिवस रात्र कसोटीत शतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचं हे 41वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटनं 188 डावांत 41 शतकं झळकावली, तर पाँटिंगला हा पल्ला गाठण्यासाठी 376 डाव खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 368 डावांत 33 शतकांसह तिसऱ्या स्थानी आहे. याशिवाय त्यानं या खेळीसह पाँटिंगचा एक विक्रम मोडला.
कर्णधार म्हणून कोहलीचं हे 20वं कसोटी शतक आहे. या विक्रमात त्यानं रिकी पाँटिंगला ( 19) मागे टाकले, तर आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 25 शतकांसह अव्वल स्थानी आहे. भारतात सर्वाधिक कसोटी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांत कोहली ( 10) टॉपवर आला आहे. त्यानं सुनील गावस्कर यांचा 9 शतकांचा विक्रम मोडला.